पुण्यासह राज्यातील अन्य भागात सध्या गुइलेन बॅरे सिंड्रोम नावाच्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस GBS आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आता राज्यात GBS रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या यंदा जानेवारी महिन्यात अचानक वाढली. ही रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होऊ लागले. याचबरोबर ‘जीबीएस’बाबत अनेक गैरसमज पसरू लागले. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांकडून 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत आढळलेल्या जीबीएस रुग्णांची आकडेवारी जमा केली.
गृहनिर्माण सोसायट्यांनी बोअरवेल, विहिरीचे पाणी तपासून वापरावे. पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून सिंहगड रस्ता परिसरातील जलस्राोतांसह खडकवासला धरणातील पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यात ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जीवाणू आढळल्याने हे पाणी प्रक्रिया न करता पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.
सिंहगड रस्ता परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमची जास्त रुग्ण आढळल्याने तेथे महापालिकेच्या पथकांनी अतिसार, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण केले होते. रुग्णसंख्या वाढीच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने बुधवारी पुन्हा या भागाचे सर्वेक्षण केले. पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेचा ‘जीबीएस’ने मृत्यू झाला आहे. या आजाराचा हा दुसरा बळी आहे. संबंधित रुग्ण नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) नांदोशी येथील रहिवासी होत्या. त्यांना 15 जानेवारीला अशक्तपणा आणि अर्धांगवायूची लक्षणे जाणवू लागली. त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती बिघडल्याने 17 जानेवारीला ससून रुग्णालयात हलविले. उपचार सुरू असताना त्यांचा 28 जानेवारीला मृत्यू झाला. श्वसनक्रिया थांबण्यासह अर्धांगवायूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.