नुकत्याच पार पडलेल्या ‘कृषिक-२०२५’, बारामती येथील कृषी प्रदर्शनात सहभागी शेतकरी आणि पशुपालकांनी अजित पवार यांच्याकडे पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व शेतकरी आणि पशुपालकांना त्याबद्दल सकारात्मक शब्द दिला होता. आज महिन्याभरात सर्व प्रक्रिया पूर्ण करून राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बारामती आणि बीड येथे दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयं उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. शेती आणि शेतीपुरक व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि पशुपालन व दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
आजच्या बैठकीत पुणे आणि बीड जिल्ह्यांमध्ये दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या महाविद्यालयांसाठी एकूण ११२९.१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून बारामतीतील कऱ्हावागज येथे ८२ एकर आणि परळीच्या लोणी येथे ७५ एकर जागेवर शासकीय महाविद्यालयं उभारली जातील. या निधीतून प्रगत संशोधन केंद्रे, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि शेतीविषयक सुविधा उभारल्या जातील. दोन्ही महाविद्यालयांसाठी ९६ शिक्षक संवर्गातील आणि १३८ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी नियमित पदं मंजूर केली गेली आहेत. याशिवाय बाह्यस्त्रोतांद्वारे प्रत्येकी ४२ पदं मानधन तत्त्वावर भरण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून, या नवीन महाविद्यालयांमुळं प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढेल, अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांची उपलब्धता अधिक सुलभ होईल आणि राज्यभरातील पशुसंवर्धन सेवा अधिक मजबूत होईल. हा निर्णय कृषिपूरक व्यवसायांना चालना देईल आणि राज्यातील पशुधन संगोपनासाठी नव्या संशोधन व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मार्ग मोकळा करेल, असा मला विश्वास असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
https://youtu.be/bt3YUa5tc7A?si=bYswYLqbPevOlzHk
रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज २५ फेब्रुवारी २०२५ रोजी बैठक पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व तसंच ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरित लोकसंख्येचं प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिल्या. रांजणगावची भविष्यातील गरज ओळखून ग्रामपंचायत परिसरात मोठ्या क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, स्वच्छ भारत मिशनमधून निधी देण्यात येईल, त्यासोबत ग्रामपंचायतीच्या वाट्यासह ‘सीएसआर’ निधी उभारण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. हिवरे पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याची उपलब्धता, लोकसंख्या आणि नागरिकांची वाढीव पाण्याची गरज लक्षात घेऊन यंत्रणांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या. यासाठीचा आवश्यक तो निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करुन दिला जाईल, असं स्पष्ट केलं. या बैठकीला राज्याचे पाणी पुवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थिती होते.