गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी प्रकल्प सनियंत्रण कक्षाची (Project Monitoring Unit) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचं दीर्घकालीन नुकसान होतं, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशा सूचना बैठकीत दिल्या. तसंच पुण्यात ‘एम्स’च्या उभारणीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले.
पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावं. पुणे रिंग रोडचं काम वेगानं मार्गी लावण्यात यावं. पुणे शहरात दरवर्षी लाखो नवीन वाहनं रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि उपनगरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसंच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढवण्यात यावा, यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागानं योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरुर’ रस्त्याच्या कामाची व्यवहार्यता तपासून पाहण्याच्या सूचना यावेळी केल्या.
लोणावळा येथील नियोजित स्काय वॉक, टायगर पॉईंट, पुणे नाशिक ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेच्या नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर, अमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचं बांधकाम, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा सैनिक स्कुल, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, वडाळा येथील जीएसटी भवन, रेडिओ क्लब मुंबई, रत्नागिरीचं मिरकरवाडा बंदर, वढू व तळापूर येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा देखील आयोजित बैठकीत घेतला.