पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकाच्या डेपोत २६ वर्षाच्या एका तरुणीवर बलात्कार झाला. ही घटना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता घडली असून दत्तात्रय गाडे (३६) या सराईत गुन्हेगाराने एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये अत्याचार केला आहे. या घटनेमुळे पुण्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. तरुणी मुलगी फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी दत्तात्रय गाडे याने तिला हेरून तिच्यावर अतिप्रसंग केला. या पीडित तरुणीच्या वैधकीय तपासणीचा अहवाल समोर आला आहे. यात आरोपीने पीडितेवर एकवेळ नव्हे तर दोनवेळा बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांची आठ पथके आरोपी दत्तात्रय गाडे याला शोध घेत आहेत. यादरम्यान पीडित तरुणीची वैधकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ससून रुग्णालयाने हा वैधकीय अहवाल बुधवारी संध्याकाळी पोलिसांना दिला आहे. या अहवालात आरोपीने पीडितेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती देण्यात आली आहे.
या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर स्वारगेट एसटी आगारात असलेली सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे स्वारगेटमधील 23 सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्य सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
स्वारगेट पोलीस स्थानकापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या एसटी डेपोत मुलीवर दोनवेळा बलात्कार होतो आणि कोणाला पत्ताही लागत नाही, याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यात सातत्याने खून, मारामाऱ्या, कोयता गँगची दहशत आणि आता बलात्कार अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पुण्यातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणात पोलीस आणि सरकार काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा: