पुणे पोलिसांनी एटीएम कार्ड बदलून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. कर्नाटकमधील म्हैसूर येथील राजू प्रल्हाद कुलकर्णी (५४) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल आणि १६६ एटीएम कार्ड्स जप्त करण्यात आली आहेत. एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांना मदतीचा बहाणा करुन कुलकर्णी त्यांचे एटीएम कार्ड चोरायचा. त्यांच्याकडून पिन नंबर जाणून घ्यायचा. त्यानंतर कुलकर्णी एटीएममधून पैसे निघत नाही, असे सांगून ज्येष्ठांना त्याच्याकडील बाद झालेले एटीएम कार्ड द्यायचा. ज्येष्ठांकडील एटीएम कार्ड चोरुन तो पसार व्हायचा. एटीएम कार्डचा गैरवापर करुन तो पैसे काढून घ्यायचा, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजवे चौकात २ फेब्रुवारी रोजी एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. तांत्रिक तपासात आरोपी कुलकर्णीने ज्येष्ठाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कुलकर्णी कर्नाटकात पसार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला कर्नाटकातून ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलीस आयु्क्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, अशोक माने, मयूर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, संतोष शेरखाने, नितीन बाबर, सागर मोरे यांनी ही कामगिरी केली.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक राहायला आहेत. निवृ्त्ती वेतन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होत असल्याने कुलकर्णी शहरातील वेगवेगळ्या भागातील एटीएम केंद्रांबाहेर पाळत ठेवायचा. ज्येष्ठ नागरिक एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर तो त्यांच्या पाठापाठ एटीएममध्ये शिरायचा. हातचलाखी करुन तो त्याच्याकडील एटीएम कार्ड ज्येष्ठांना द्यायचा. ज्येष्ठांकडील कार्ड घेऊन तो त्यांच्या खात्यातून पैसे चोरायचा. गुन्हा केल्यानंतर तो कर्नाटकात पसार व्हायचा.आरोपी राजू कुलकर्णी याने एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली. त्याने विश्रामबाग, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, कोथरुड, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, सहकारनगर, तसेच आळंदी परिसरात फसवणुकीचे १६ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. कुलकर्णी याने फसवणुकीतून मिळालेल्या पैसे मैत्रिणीसाेबत मौजमजा करण्यासाठी खर्च केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.
हे ही वाचा:
Uddhav Thackeray : पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी खासदार व आमदारांच्या महत्त्वपूर्ण बैठक
आरे’चा मास्टर प्लॅन तयार; कायापालट लवकरच दिसणार ! दुग्धविकास मंत्री Atul Save यांची ग्वाही