spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

धक्कादायक घटना ! पुण्याच्या IT कंपनीत तरुणीवर हल्ला

सध्या काही दिवसांपासून आपण वर्तमानपत्रात आणि न्यूज चॅनेलवर हत्याकांड, जाळपोळ, बलात्कार, अपघात अशाच घटना ऐकतोय आणि पाहतोय. अशा घटना याआधीही आपण ऐकल्या आणि पाहिल्याही. मात्र, ज्या पद्धतीने आणि झपाट्याने या घटना आपल्या ड़ोळ्यांपुढून जात आहेत त्याला कुठलीही मर्यादा राहिलेली नाही. समाजात वाढत जाणारे गुन्हे हे केवळ एक फॅशन किंवा मी तुझ्यापेक्षा किती ताकतवान आहे हे सिद्ध करण्याचं भांडवल झालंय. स्वतःला वरचढ ठरवण्याच्या नादात आपण आपलेच किती नुकसान करतोय याची कल्पना सुद्धा गुन्हेगाराला होत नसते. अशातच अंगाला शहारे येतील अशीच एक घटना पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये घडली आहे. २८ वर्षीय तरूणीवर तिच्या सहकाऱ्याने मंगळवारी ७ जानेवारीला संध्याकाळी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्या महिलेचा मृत्यू झाला. पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा कोदारे हिच्यावर तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजा याने हल्ला केला. पुणे शहरातील येरवडा भागातील एका आयटी कंपनीत ही घटना घडली. यामध्ये शुभदा ही गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभदा कोदारे ही पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीमध्ये अकांऊटंट म्हणून काम करत होती. तिचा सहकारी कृष्णा कनोजा आणि तिच्यामध्ये पैशावरुन वाद सुरू होता. यातूनच आरोपीने हा हल्ला केला.

शुभदा आणि कृष्णा हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून आर्थिक वादातून हे सगळं प्रकरण घडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशांची देवाण घेवाण झाली होती. मंगळवारी संध्याकाळी शुभदा तिचे काम संपवून पार्किंगमध्ये असलेल्या गाडीतून घरी जात होती. याच वेळी कृष्णा तिथे आला आणि त्याच्या हातात भाजी कापण्यासाठी वापरलेला कोयता होता. त्याने शुभदाला अडवले आणि उजव्या हाताच्या कोपऱ्यावर हल्ला केला. हा घाव इतका गंभीर होता की शुभदा तिथेच कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी कनोजाला ताब्यात घेतले असून, मृत तरूणीच्या बहिणीच्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील नामांकित कंपनीच्या आयटी पार्किंगमध्ये ही घटना घडल्याने आता कंपनीच्या आवारात देखील महिला व मुली सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या काही घटनांमुळे पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी पोर्शे कार अपघात, सतीश वाघ हत्या प्रकरण आणि आता त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे गुन्हेगारीच्या घटनांची मालिका कायम सुरू असल्याचं दिसतंय.

हे ही वाचा:

अभिनेत्री पूनम धिल्लनच्या घरी झाली चोरी, हिऱ्यांचा नेकलेस, -रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला केली अटक

HMPV Virus Cases : देशात HMPV विषाणूच्या रुग्णांमध्ये झाली वाढ, 30 टक्के प्रकरणे महाराष्ट्रात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss