पुण्याचे (Pune) पालकमंत्री (Guardian Minister) नेमके कोण आहेत असा प्रश्न सध्या पुणेकरांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. कारण राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून उपमुख्यमंत्री (DCM) अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात प्रशासकीय बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्रिपद जरी भाजपच्या (BJP) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसत आहेत. मागील आठवड्यात अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. या बैठकांना चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हतं. त्याआधी देखील अजित पवारांनी अशा बैठका घेण्याचा सपाटा लावला होता.
पत्रकारांनी याबाबत विचारले असता आपण मंत्री असल्याने आपल्याला बैठका घेण्याचा अधिकार आहे असं उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे. आज देखील पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडून तसाच मेसेज पाठवण्यात आला आहे. या बैठकीला पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांना आमंत्रण असले तरी बैठकीचे नेतृत्त्व अजित पवार करणार आहेत. त्यामुळे सत्तेत सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट (Ajit Pawar Group of NCP) चंद्रकांत पाटील यांच्यावर कुरघोडी करताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी पुणे जिल्ह्याची ओळख आहे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विकासकामे, अन्य प्रश्न, रखडलेले प्रकल्प याबाबत अजित पवार आठवड्यातून एकदा बैठक घेत होते. परंतु राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्याकडे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तरीही पुण्यात प्रशासकीय बैठका घेणं अजित पवारांनी मात्र कायम ठेवलं आहे. त्यामुळे सत्तेत असूनही चंद्रकांत पाटील यांच्यासमोर अजित पवार यांचं आव्हान असल्याचं म्हटलं जात आहे.
हे ही वाचा:
गोल्ड मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्रा याने दिला देशवासीयांसाठी संदेश
राशिभविष्य २८ ऑगस्ट २०२३, आजच्या दिवशी तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल.