Raj Thackeray: संपूर्ण महाराष्ट्रभर २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. प्रत्येक मराठी माणूस हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. हा दिवस आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वारशाला उजाळा देण्याचा आहे. भारतातील अनेक प्रमुख भाषांपैकी एक मराठी भाषा आहे. तसेच मराठी भाषेला खूप मोठ्या प्रतिक्षेनंतर आता अभिजात भाषेचा दर्जा देखील देण्यात आला आहे. दरवर्षी हा दिवस आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वारशाला उजाळा देण्याचा म्हणून साजरा केला जातो. या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत दादर इथल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मनसेकडून एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तक प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काही मान्यवरांच्या आवडीच्या कवितांची मैफलही रंगणार आहे. तसेच महाराष्ट्राचे राजवस्त्र असलेली पैठणी कशी विणतात हे पाहण्याची संधी या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. नेमकं या पुस्तक प्रदर्शन सोहळ्यात काय काय असणार आहे.
मराठी भाषदिनानिमित्त शिवाजी पार्कवर मनसेतर्फे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नामांकित प्रकाशकांच्या पुस्तकांचे १०५ स्टॉल्स या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. हे पुस्तक प्रदर्शन गुरुवार, २७ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असेल. म्हणजे सुमारे चार दिवस हा प्रदर्शन सोहळा सुरु रहाणार आहे. गुरुवारी संध्याकाळी पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आवडीच्या कविता वाचन करणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर यावेळी कविता वाचन करणार आहेत.
या पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमात आदान प्रदान’अंतर्गत घरातील जुने पुस्तक आणि दहा रुपये देऊन कोणतेही पुस्तक वाचकांना घेता येणार आहे. हे प्रदर्शन अनेक शाळकरी तसेच महाविद्यालयीन विध्यार्थी तसेच लाखो पुस्तकप्रेमी पाहायला येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय पैठणी कशी विणली जाते हेही या ठिकाणी पाहायला मिळणार असल्याचे मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.
या भव्य पुस्तक प्रदर्शनाबाबत स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितले की, मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा , पण त्यासाठीची खिडकी ही मराठीची असावी. आणि म्हणूनच हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत. या प्रदर्शनाला जरूर भेट द्या, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे. मनसे आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शनानिमित्त अनेक मान्यवरांचे काव्यवाचन या ठिकाणी होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची उपस्थिती असणार आहे. शिवाय, जावेद अख्तर, अशोक सराफ, सोनाली बेंद्रे, विकी कौशल, आशुतोष गोवारीकर,अभिजात जोशी, रितेश देशमुख, शर्वरी वाघ, नागराज मंजुळे, विजय दर्डा, भरत दाभोळकर, गिरीष कुबेर, पराग करंदीकर, राजीव खांडेकर, महेश मांजरेकर, लक्ष्मण उतेकर आणि राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन येणार आहेत. विशेष म्हणजे मराठी साहित्याचं दर्शन घडवणारं हे प्रदर्शन असेल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
या प्रदर्शनाचं औपचारिक उदघाट्न झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी, असे जवळपास १७ मान्यवरांनी आनंदाने या कल्पनेला होकार मिळाला असे देखील राज ठाकरे यांनी सांगितले आहे. इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल तो प्रत्यक्ष अनुभवायला याच. आपली मराठी भाषा ही आपली ओळख आहे आणि आपली शक्ती पण. या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे हे पुढच्या पिढयांना कळायलाच हवं. आणि हे का करावं लागेल तर आजकाल दोन मराठी माणसं सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. असं का होतंय हे कळत नाही…मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरु देखील आहे ,पण मराठी ही आता ज्ञानाची भाषा देखील व्हायला लागली आहे. जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तकं मराठीत येत आहेत, ज्यातून बदलत्या जगाचं भान येणं सहज शक्य आहे. हे आत्ताच पुढच्या पिढ्यांच्या मनात रुजवावं लागेल. आणि हे जर घडलं तर अजून ताकदीने लेखक, विचारवंत या भूमीत निर्माण होतील.मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून या पुस्थक प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तक प्रदर्शन सोहळ्याला नक्की भेट द्या.
हे ही वाचा:
Follow Us