सातारा जिल्हा परिषदेकडून डोंगरदऱ्यातील व दुर्गम भागातील नैसर्गिक स्रोत असणाऱ्या झऱ्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. डोंगराळ व दऱ्याखोऱ्यातील दुर्गम भागांत पाण्याची सहज उपलब्धता होऊ लागल्याने या झऱ्यांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. मात्र दुष्काळी परिस्थितीत आणि टंचाईच्या काळात या झाऱ्यांचे महत्त्व ओळखून प्रशासनाने झऱ्यांचे नवनिर्माण करून संवर्धन करण्याचे ठरविले आहे.
झऱ्यांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळे झरे आटले आहेत. त्यांचे पुनर्जीवन करून संवर्धन करण्यात येणार आहे. झरे हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत असून त्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. पूर्वी वर्षानुवर्षे दुर्गम डोंगराळ वाडी वस्तीतील लोकसंख्या, गुरे झऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून असायची. वनस्पती आणि प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजातीदेखील झऱ्यांनीच टिकवून ठेवल्या. वाढते तापमान, पावसाचे कमी जास्त प्रमाण, पाण्याची टंचाई याचा खूप मोठा परिणाम झऱ्यांवर झाला नाही, त्यामुळे डोंगराळ भागात वस्ती व नैसर्गिक संपदा टिकवून ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली.
नैसर्गिक साखळी जिवंत ठेवण्याचे काम झऱ्यांनी केले. मात्र झऱ्यांचे अस्तित्व संपल्याने सातत्याने दुर्गम भागात पाणीटंचाई जाणवत असते. या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. कधीकधी टँकर वेळेत पोहोचत नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई सातत्याने जाणवत असते. यावर पर्याय म्हणून सातारा जिल्हा परिषदेने लोकसहभागातून झरे संवर्धनाचे काम सुरू केले आहे. दुर्गम भागातील १६३ झऱ्यांना यामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. या झऱ्यांना नवसंजीवनी देण्याचे काम सुरूही झाले आहे. यासाठी ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोगातून निधीही उपलब्ध करण्यात आला आहे
झऱ्यांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळे झरे आटले आहेत. झऱ्यांच्या संवर्धनात स्प्रिंग बॉक्स बांधण्यात येत आहे. भूगर्भ रचना समजून झऱ्यांचा स्तोत्र शोधला जातो. पाण्याची नैसर्गिक स्वच्छता राखण्यासाठी फिल्टरचा वापर करण्यात येत आहे. झऱ्यांवरून पाणी घेण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करण्यात येत आहे, अशा पद्धतीने दुर्गम भागातील झऱ्यांचे संवर्धन केले जात आहे.
हे ही वाचा :
Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व
Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार