भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण(एफएसएसएआय) पश्चिम क्षेत्रमार्फत ‘संकल्प स्वच्छ आहार’ उपक्रमांतर्ग दि. १२ जानेवारी रोजी बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर शाळेत रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात २००० पेक्षा जास्त विक्रेते सहभागी होणार असून विषय तज्ञाव्दारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री यांनी २०२३ च्या जागतिक अन्न सुरक्षा दिनी केलेल्या घोषणेला अनुसरून आहे. ज्यामध्ये २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस अन्न हाताळणी करणाऱ्या २.५ दशलक्ष जणांना प्रशिक्षण देण्याचे काम एफएसएसआयला देण्यात आले आहे.
एफएसएसआयचा फोस्टॅक (FOSTAC) कार्यक्रमातंर्गत अन्न हाताळणाऱ्यांना, ज्यामध्ये रस्त्यावरील विक्रेत्यांना अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानके राखण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी तयार केला गेला आहे. या प्रशिक्षणात वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी आणि अन्नपदार्थ दूषित होण्यास प्रतिबंध यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.
विक्रेत्यांना नियामक अनुपालन आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी करावयाचे उपाययोजनाची माहिती यावेळी दिली जाणार आहे..या प्रशिक्षणाचे खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचे सहायक संचालक ज्योती हरणे यांनी केले..जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात ‘संकल्प स्वच्छ आहार’ उपक्रमांतर्गत खाद्य विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.