बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज १० जानेवारीला जालन्यात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. अंबड चौफुली येथे सभा घेऊन मोर्चचा समारोप होणार आहे. या मोर्चाला भाजप आमदार सुरेश धस हे मार्गदर्शन करणार आहेत. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख या मोर्चात सहभागी होण्यासाठी देशमुख कुटुंबिय जालन्यात दाखल झाले आहेत.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याचे वातावरण चांगलेच तापलेले असतानाच या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी मागणी जोर धरत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत.
आम्हाला न्याय मिळावा आणि जी घटना घडली आहे ती पुन्हा होऊ नये हीच आमची मागणी आहे. कोणाकोणाचा संबंध आहे हे तपासात निष्पन्न होईल. मुख्यमंत्र्यांना आम्ही सर्व वृतांत सांगितला, वेळीच जर गुन्हे नोंद केले असते तर ही घटना घडली नसती असे सुद्धा त्यांना सांगितले. आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे. नागरिकांनी असेच कायम आमच्यासोबत रहावे, आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी केली आहे.