राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवसीय आढावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकुशलतेचं व संघटनाचं कौतुक केलंय. तर यावर भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोलताना पुन्हा एकदा शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकुशलतेचं व संघटनाचं कौतुक केलंय. शरद पवारांकडून संघ परिवाराकडून सूक्ष्म पद्दतीने सुरू असलेल्या कामाचा पुन्हा एकदा भाषणातून उल्लेख करण्यात आला. संघ परिवाराकडून कार्यकत्यांच्या आयुष्यातील महत्वाची 20 वर्षे घेतली तरी त्याला वाऱ्यावर न सोडता योग्य ठिकाणी आयुष्यभरासाठी समायोजन केलं जात असल्याचं सांगण्यात आलं, यावेळी त्यांनी पुणे शहराचं उदाहरण दिलं. पुण्यासारख्या शहराची विद्येचे माहेरघर म्हणून ओळख आहे. मात्र, याच शहरातील प्रत्येक महत्वाच्या शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक काम करत आहेत. फर्ग्युसन महाविद्यालय, सप महाविद्यालय, मॉर्डन कॉलेज, एमइएस कॉलेजवर संघाचे कार्यकर्ते आहेत. अशा संस्थांवर अनेक वर्ष बाहेरच्या राज्यात संघासाठी काम करून पुन्हा माघारी आलेल्या लोकांना बसवलं जात आणि त्यांची आयुष्याची योग्य सोय लावली जात असल्याचे शरद पवारांनी आढावा बैठकीदरम्यानच्या भाषणात कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
शरद पवार साहेबांचं दुर्दैव असं आहे, त्यांनी स्तुती केली तरी सुद्धा तुम्हाला शंका येते, त्यांनी टीका केली तरी तुम्हाला शंका येते. पण ते मात्र खमके आहेत. तुम्ही त्यांना काही म्हणा ते याही वयात कामच करत असतात, त्यांनी स्तुती केली तर चांगलं आहे. तुम्ही त्यांच्याकडे का स्तुती केली अशा संशयाने का बघताय? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी मिश्किल पणे पत्रकारांना केला आहे.