पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका तरुणीवर शिवशाही बस मध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे पुणे हादरलं आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही पुण्यात कमला होती. घटनेच्या दिवशी ती सकाळी साडेपाच ते पावणेसहा दरम्यान ही तरुणी फलटणला आपल्या गावी निघाली होती. त्यासाठी ही तरुणी स्वारगेट डेपोत आली. त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे हा तरुणीच्या आजुबाजूला घुटमळत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही तरुणी ज्याठिकाणी बसली होती, तिच्या शेजारी आणखी एक व्यक्ती होती. आरोपी तरुणीशी बोलायला आल्यानंतर हा व्यक्ती निघून गेला. त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीशी गोड बोलून ओळख काढली. कुठे जाते ताई? असे त्याने तरुणीला विचारले. त्यावर तरुणीने आपल्याला फलटणला जायचे असल्याचे सांगितले. त्यावर दत्तात्रय गाडे म्हणाला की, सातारची बस तिकडे लागली आहे. त्यावर तरुणी म्हणाली की, सातारची बस इकडेच लागते म्हणून मी इथे बसलेय. पण आरोपीने तरुणीला बस दुसरीकडे लागली आहे, मी तुला तिकडे घेऊन जातो, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी आरोपीच्या पाठीमागे चालत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही मुलगी बसजवळ पोहोचली तेव्हा अंधार होता. त्यामुळे तिला बसमध्ये चढायचे की नाही, हा प्रश्न पडला. त्यावर आरोपीने म्हटले की, रात्रीची बस आहे, लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत. तू वर चढून टॉर्चने चेक कर. त्यानंतर ही तरुणी बसच्या आतमध्ये गेली तेव्हा आरोपीने पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा लावून घेतला. यानंतर आरोपीने तरुणीवर अतिप्रसंग केला. अत्याचार झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला. त्यानंतर मुलगीही बसमधून खाली उतरली. ती दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती, तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला. मित्राने सांगितल्यावर ही तरुणी पोलीस ठाण्यात आली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
डॉग स्क्वॉड घेऊन शेतांमध्ये तपास सुरु
या मुलीने आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर आम्ही लगेच स्वारगेट एसटी डेपोचे सीसीटीव्ही फुटेज बघितले. यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेची ओळख पटली. हा गुन्हेगार असून तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील असून तो शिरुर येथे राहणारा आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आम्ही या घटनेनंतर आरोपीला शोधण्यासाठी आठ पथके तयार केली. या टीम आरोपीचा शोध घेत आहेत. आमही जवळपासच्या शेतांमध्ये डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने तपास सुरु केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा:
Rashmika Mandanna: साऊथ अभिनेत्री रश्मीका मंदानाकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, ५ महागड्या गाड्या
Amol Kolhe: स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट का गुंडाळण्यात आला? अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा