एसटी बसच्या तिकीट दरात १५ टक्के वाढ करून सर्वसामान्यांना खिसा कापणाऱ्या महायुती सरकारला दणका देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज २८ जानेवारीला राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आला आहे. आज मुंबईपासून ते मराठवाड्यापर्यंत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत चक्का जाम आंदोलन केले.
पनवेल एसटी डेपो येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एसटी भाडेवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत चक्का जाम केला. शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ही भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.
पनवेलमधील एसटी डेपोजवळ मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी भाडेवाढीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चक्का जाम हटवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, शिवसैनिक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
जर सरकारने भाडेवाढ रद्द केली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. “जनतेवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. एसटी भाडेवाढ रद्द करण्याबाबत सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एसटीच्या तिकीट दरवाढीवरून महायुती सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. या दरवाढीचे सुरुवातीला समर्थन करणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकदम यु टर्न घेतला आहे. या दरवाढीची मला कल्पनाच नव्हती. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे भाडेवाढ झाली, असे सांगत प्रताप सरनाईक यांनी हात वरती केले आहेत. मात्र दुसरीकडे एसटीच्या ताफ्यात २५ हजार बसेस दाखल करण्यास वित्त मंत्री अजित पवार यांनी आज मान्यता दिली आहे.
हे ही वाचा :
ई पंचनामा प्रकल्पाचे प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करावी CM Devendra Fadnavis यांचे निर्देश