कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या एसटी बसवर हल्ला केला. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसला काळं फासलं. तसेच एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केली. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का? अशी विचारणा केली. यानंतर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुढाकार घेत कन्नड रक्षक वेदिका संघटनेला विरोध केला आहे.
सोलापुरातील सात रस्ता परिसरात कर्नाटकला जाणाऱ्या बसला अडून बसच्या काचेवर जय महाराष्ट्र लिहून निषेध व्यक्त करण्यात आला. बेळगाव येथील महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसला आडून वाहक आणि चालकाला काळे फासण्याचा प्रकार झाला होता. बेळगाव येथील प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदारपणे निषेध व्यक्त करण्यात आला. कानडी बस चालकाचा हार आणि भगवा रंग लावून बेळगाव प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कानडी चालकाने जय महाराष्ट्र म्हटल्यानंतरच विजापूरच्या दिशेने बस रवाना झाली. महाराष्ट्रातील बसेसला कर्नाटकात सन्मानाची वागणूक द्यावी अन्यथा कर्नाटकातील बस सोलापुरात फोडल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बेळगाववरुन सीमावाद आहे. त्यावरून दोन्ही राज्यात हिंसक आंदोलने झाली आहेत. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधी सुद्धा त्यांनी अनेकदा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले आहेत. २०२२ साली डिसेंबर महिन्यात बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर जोरदार हल्ला केला होता.