उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे व बीडचे पालकमंत्री झाल्यापासून आज पहिल्यांदाच ते बीड दौऱ्यावर गेले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीडच राजकारण ढवळून निघाले आहे. आज अजित पवार यांच्या उपस्तिथीत डीपीडीसीची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे आजची डीपीडीसीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) अजित पवार बीड मध्ये असतांना चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुप्रिया सुळे या थेट दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला न्याय द्यावा. गेल्या ५१ दिवसांपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे कुठे आहे? तसेच अंजली दमानिया यांनी सर्व कागद दिले आहेत. मी ही पार्लमेंटमध्ये हा विषय मांडणार आहे. महाराष्ट्रासाठी आम्ही पार्लमेंटमध्ये न्याय मागणार आहोत. तर, भाजप आणि शिंदे यांच्या खासदारांची दिल्लीत भेट घेणार आहे. तसेच दिल्लीत अमित शाह यांची देखील भेट घेणार आहे. त्यांना महाराष्ट्रातील परिस्थिती सांगणार आहे. तुमच्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे काय सुरु आहे, असे माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या,माझे सरकारला काही प्रश्न आहेत. गेली ५१ दिवस होऊनही एक खुनी फरार आहे. बीडमध्ये हार्वेस्टर आणि पिक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे आहेत. याची आत्ताच्या कृषिमंत्र्यांनी कबुली केली आहे. पीकविमा आणि हार्वेस्टर हा घोटाळा कुठे कुठे झाला आहे? याची सर्व माहिती राज्य सरकारकडे आहे ती सरकारने द्यावी. सुरेश धस यांनी केलेल्या आरोपावर सरकार काय निर्णय घेणार? पिक आणि हार्वेस्टरबाबत आजच्या डीपीडीसीमध्ये चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलंय की, नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. मात्र, ते राजीनामा का देत नाहीत? हे त्यांनाच विचारा.
हे ही वाचा :
मराठी सिनेमांच्या बिकटतेवर अभिनेता Santosh Juvekar याचे परखड भाष्य