Suresh Dhas Meet Santosh Deshmukh Family : मस्साजोगला आज म्हणजे २२ फेब्रुवारी रोजी भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आकाचे आका म्हणत सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार राळ उडवून दिली आहे. काही दिवसांपूर्वी सुरेश दासांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं होत. मात्र भेट घेतल्याचं उघड झाल्यावर सुरेश धस पहिल्यांदाच देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी मस्साजोग गावात पोहचले.
सुरेश धस यांच्या भेटीनंतर धनंजय देशमुख काय म्हणाले?
भाजप आमदार सुरेश धस मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत असताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाशी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर आरोपीला मदत करणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत,असं सुरेश धस म्हणाले. पोलिसांनी तपास सीआयडीकडे देऊन मोकळे झाले आणि जवाबदारी झटकली, तसेच आरोपीला केज पोलीस कसे मदत करत होते, असा आरोप करत धनंजय देशमुखांनी संपूर्ण माहिती सुरेश धस यांना दिली.
वाशी पोलिसांच्या भूमिकेवर धनंजय देशमुख काय म्हणाले?
खालच्या पातळीतून रिपोर्टिंग समोरच्यापर्यंत चुकीची जाते, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. वाशीमधील पोलीस अधिकारी हे आरोपी सोबत पळून जाताना फोनवर बोलले आहेत. केज पोलिसांनी कोणतेही पुरावे दिले नसून नागरिकांनी सीसीटीव्ही पुरावे यंत्रणेला सादर केले आहेत. त्यामुळे या संवेदनशील केसमध्ये पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे होते असे वक्त्यव्य धनंजय देशमुख यांनी केले आहे. त्याचबरोबर आरोपींचे फोन कॉल पोलिसांना का गेले?, आरोपी जंगलातून पळाले असं देशमुख कुटुंबाला खोटे सांगण्यात आले, असं धनंजय देशमुख म्हणाले. यावर धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे जंगल कुठे आहे?, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला.
त्यांनंतर सुरेश धस यांनी आपली भूमिका मांडत पोलीस अधिकारी महाजन आणि पाटील हे सहआरोपीच झाले पाहिजेत असे म्हणाले. पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून घेतला नाही. त्याचबरोबर सुरेश धस वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती दिली.तसेच डॉक्टर संभाजी वायभसे याला देखील सहआरोपी करा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.