spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

निवृत्त न्यायमूर्ती आणि मराठी साहित्यिक लेखक नरेंद्र चपळगावकर यांचे शनिवारी (२५ जानेवारी) पहाटे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते. छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी विश्वात आणि न्यायव्यवस्थेत त्यांच्या जाण्याच्या बातमीने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

स्वातंत्र्य संग्राम, हैद्राबाद मुक्ती संग्रामात सक्रिय असलेल्या वडिलांकडूनच न्यायमूर्ती चपळगावकर यांना वैचारिकतेचा वारसा लाभला. त्यांचा मराठवाड्यासह राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचा गाढा अभ्यास होता. प्राध्यापक, वकिल, न्यायमूर्ती, साहित्यिक आणि विचारवंत अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या लेखनात सहजता आणि वक्तृत्वात परखडता होती. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील चरित्रात्मक लिखाणामुळे स्वामींचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले. कथा, कवितांचे लेखन करतानाच वैचारिक लेखन सर्वसामान्यांपर्यंत पोहचले पाहिजे, यासाठी शब्दांच्या निवडीवर त्यांचा विशेष भर असे. त्यांची ग्रंथसंपदा हे मागे राहिलेले विचारधन आहे.

न्या. चपळगावकर यांच्या निधनाने एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

हे ही वाचा : 

एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss