जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. आंदोलकांनी टाकलेल्या मंडपात पोलीस घुसले. यावेळी पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज केला. आंदोलकांकडून दगडफेक झाली, असा आरोप पोलिसांचा आहे. जालना जिल्ह्यातील अंतर्वली गावात संबंधित घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने त्याच्या काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. आरक्षण थेट जाहीर करावं, अशी त्यांची मागणी होती. या दरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ते उपोषणावर ठाम होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते. पण पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला.
२९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला. या घटनेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “मला जालन्यातून एक-दोन लोकांचे फोन आले. तिथे काय घडलं हे सांगितलं. तिथे मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. पोलिसांनी मनोज जरांगे यांच्याशी विचार विनिमय केला. त्या चर्चेत सर्व शांततेने झालं होतं. पण चर्चेनंतर पोलीस बळाचा वापर करुन त्यांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यात त्या तरुणांवर प्रचंड लाठीहल्ला केला”, असं शरद पवार यांनी सांगितलं.
एकदा तुम्ही चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला करण्याची काही आवश्यकता नव्हती. पण हल्ली विशेषत: सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रश्नांसंबंधित कोणताही प्रश्न असले तर ते रस्त्यावर आले तर बळाचा वापर ही राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दल मनामध्ये जी भावना असेल ती भावना पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. ते व्यक्त झालेले चित्र आपण जालन्यात पाहिले. त्यामध्ये पोलिसांना काय दोष द्यायचा. याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची, गृह खात्याची जबाबादारी घेणाऱ्यांची आहे, मी याचा तीव्र निषेध करतो. हे थांबवण्यासाठी त्या लोकांना तिथे जाऊन धीर द्यावं लागेल”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.