Thursday, November 30, 2023

Latest Posts

THANE: ही शाखा कुणाची? ठाकरे-शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांत वाद

ठाकरे (THACKERAY GROUP) आणि शिंदे गटाच्या (SHINDE GROUP) पदाधिकाऱ्यांचा ठाण्यातील शाखेवरून सुरु असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. आता मुंब्रा (MUMBRA) येथे हा वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे. मुंब्र्यातील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली आहे. त्यानंतर ती जागा बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली आहे. या शाखेत ठाकरे गटाचे पदाधिकारी गैरकारभार करत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शिंदे गटाला या शाखेच्या ठिकाणी व्यावसायिक गाळे उभे करायचे असल्याच्या दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मागच्या दीड वर्षात ठाण्यात विविध विभागातील शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये वाद रंगला. गुरुवारी दुपारी ठाकरे गटाचे मुंब्रा शहरप्रमुख विजय कदम आणि काही पदाधिकारी शाखेत बसलेले असताना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक राजन किणे हे त्यांच्या समर्थकांसोबत मुंब्र्याच्या शाखेत आले. त्यांनी या शाखेचा ताबा घेतला, त्यांनी रात्रीच्या सुमारास ही शाखा बुलडोझरने जमीनदोस्त केली.

या शाखेच्या आजूबाजूला अनधिकृत पद्धतीने व्यावसायिक वापरासाठी जागा देण्यात आली होती, असा आरोप राजन किणे यांनी केला. याठिकाणी कोणीही येऊन नागरिकांच्या हक्कासाठी काम करत नव्हते, वर्षातून केवळ दोनवेळा शाखा उघडली जात असल्याचेही किणे म्हणाले. त्यामुळेच ही शाखा पाडून येत्या दोन दिवसांत नव्याने शाखा उभारण्याचे काम सुरू करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सुरुवातीला शिवसेनेत असलेले राजन किणे यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते नगरसेवक म्हणून पालिकेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी ‘मुंब्रा विकास आघाडी’चा प्रयोग केला. सध्या ते शिंदे गटात काम करत असल्याने या वादाबाबत ठाकरे गटाचे वरिष्ठ पदाधिकारी काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे ही वाचा : 

मुंबईतील प्रदूषणासंदर्भात केतकी माटेगावकरने केली महापालिकेला विनंती,पोस्ट चर्चेत

६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ७ नोव्हेंबरपासून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss