१९४९ च्या चार्टर्ड अकाउंट्स ॲक्टने निर्माण करण्यात आलेली ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया’ (ICAI) ही देशातील अग्रगण्य संस्थांपैकी एक संस्था असून चार्टर्ड अकाऊंट या पेशाच्या नियमन आणि विकासासाठी सातत्याने काम करणारी महत्त्वपूर्ण संस्था आहे. या संस्थेचा नावलौकिक फक्त देशातच नसून संपूर्ण जगभरात या संस्थेला मानाचे स्थान आहे आणि आनंदाची बाब म्हणजे या संस्थेची एक शाखा आपल्या कल्याण शहरात सुरू होत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
लोकहितार्थ देशाच्या अर्थव्यवस्थेची सेवा करण्याची महान परंपरा लाभलेल्या या संस्थेची शाखा आपल्या कल्याणमध्ये सुरु व्हावी, अशी माझीही इच्छा होती. कारण कल्याण-डोंबिवलीसह, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, भिवंडी तसेच कर्जत नेरळपर्यंत साधारणतः ५ हजार सीए कार्यरत आहेत. १५ हजार विद्यार्थी सीए होण्याचे शिक्षण घेत आहेत. या सर्वांना प्रशासकीय कामासाठी किंवा कोर्सेससाठी मुंबई किंवा ठाण्याला जावे लागते. त्यामुळे कल्याणमध्ये या संस्थेची शाखा झाल्यास सर्वांचीच मोठी सोय होईल या हेतूने शाखेच्या जागेसाठी पाठपुरावा केला, अनेक बैठका घेतल्या असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
आजवर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित म्हणून कल्याणमध्ये या संस्थेची शाखा सुरू होत असून शाखेचे भूमिपूजन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी, आमदार विश्वनाथ भोईर, राजेश मोरे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ICAI चे अध्यक्ष रणजीत कुमार अगरवाल तसेच उपाध्यक्ष चरणज्योतसिंह नंदा हेही उपस्थित होते. राज्यातील ही अशी पहिली वास्तू आहे, ज्याचा सीए आणि त्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या दोघांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्सेस तसेच संस्थेच्या सदस्यांचे ट्रेनिंग आता इथेच होणार असून या शाखेमुळे विकासाकडे भरधाव वेगाने वाटचाल करणाऱ्या कल्याण-डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठी बंधु-भगिनींच्या अनमोल प्रेमात मला राहायचंय- CM Devendra Fadnavis