Shrikant Shinde : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ तारखेला त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर ठाण्यात २७ तारखेला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. “कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ ही माझी ओळख सर्वाधिक मोठी आहे.” असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, अशी भूमिका घेत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून काल माघार घेतली. त्यामुळे राज्यात आता भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपल्या वडिलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
श्रीकांत शिंदे यांची पोस्ट –
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.
सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे.
खूप अभिमान वाटतो बाबा!
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule