कल्याण शिळफाटा छेद रस्त्यावरील काटई ते बदलापूर-कर्जत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. पावसाळा थांबून एक महिना झाला तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्यावरील रस्ते सुस्थिती, रस्त्यावरील खड्डे भरणी ही कामं हाती घेत नसल्याने प्रवाशी आता हैराण झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काँक्रीटीकरण केलेल्या या रस्त्यांची दुरावस्था झाल्याने या रस्त्यांच्या कामाच्या दर्जाविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
काटई ते बदलापूर-कर्जत रस्त्यावरून ठाणे, मुंबईकडून येणारी वाहने काटई येथे वळण घेतात आणि इच्छित स्थळी जातात. बदलापूर आणि अंबरनाथ येथे औद्योगिक क्षेत्र असल्याने सर्वाधिक मालवाहू वाहने यावरून धावतात. या रस्त्याची खोणी, काटई, नेवाळी नाका भागात रस्त्याची अगदी चाळण झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. या रस्त्यावरील खड्डे मोठ्या आकाराचे झाले असून रस्त्याच्या खालच्या भागातील खडी सततच्या वाहन वर्दळीमुळे रस्त्यावर पूर्णपणे पसरली आहे. या खडीवर दुचाकी गाड्या घसरून पडण्याचं प्रमाण फार मोठा आहे. स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार या भागात रात्रीच्या वेळेत बऱ्याच दुर्घटना घडत असतात. कर्जतपासून ठाणे, नवी मुंबई या भागात नोकरी, व्यवसाय करत असलेले बहुतांशी नागरिक त्यांच्या खासगी वाहनाने कर्जत-बदलापूर, काटई रस्त्याने प्रवास करतात. मुरबाड आणि त्या जवळील भागात जाण्यासाठी हा मधला मार्ग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मुंबई परिसरातील अनेक प्रवासी या रस्त्यालाच सर्वाधिक प्राधान्य देतात.
ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार हा रस्ता आधी एमआयडीसीच्या अखत्यारीत होते, तेव्हा या रस्त्याची देखभाल नियमितपणे केली जात होती, पण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित गेल्यापासून या रस्त्यावरील प्रश्नांचा तोडगा निघत नाही. खोणी गाव भागात अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला गटाराची कामं सुरु आहेत पण ही कामं खूप संथ गतीने चालू आहेत त्यामुळे या रस्त्यासाठी खोदली गेलेली माती रस्त्यावर पसरत आहे. या रस्त्याकडे कोणाचंच लक्ष नसल्याने प्रवाशी फार नाराज झाले आहेत, तसेच या रस्ते कामाच्या तक्रारी कुठे करायच्या ज्यामुळे हा प्रश्न मार्गी लागेल,असा प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर आहे..
हे ही वाचा :
OLA, UBER, SWIGGY चा एक दिवसीय बंद
Chandrasekhar Bawankule यांचा हल्लाबोल, उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या रुग्णालयात गेल्याने त्यांना…