Bhiwandi Crime: उत्तर प्रदेश येथील कौटुंबिक जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जोगेश्वरी मुंबई येथील ओला चालक अक्रम कुरेशी वय 22 वर्ष याचे प्रेमिकेकडून फसवून भिवंडी येथे भेटण्यास बोलावून दबा धरून बसलेल्या आरोपींनी तरुणाची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .याप्रकरणी तरुणीसह पाच जणांना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी पोलीस ठाणे हद्दीत मौजे पोगाव गावाजवळ, तानसा पाईप लाईन शेजारील रस्त्यावर 17 जानेवारी रोजी अक्रम इकबालुद्दीन कुरेशी वय 22 वर्ष रा. जोगेश्वरी, मुंबई या ओला चालकाची गाडी भाडे घेऊन आले असता अज्ञाताने लोखंडी रॉड व दगडाने ठेचून त्याची निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली होती.याप्रकरणी अज्ञातां विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी दोन स्वतंत्र पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला असता घटनास्थळा जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले.त्यामध्ये मयत इसम हा एका महिलेसोबत येत असताना दिसून आला.पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून संशयित महिला जस्सी तिवारी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता या हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. महिलेकडे केलेल्या तपासात मोहमंद कैफ मोहंमद रफिक कुरेशी, वय २२ वर्षे,इसामुद्दीन रियाजुद्दिन कुरेशी, वय ३५ वर्षे,सलमान मो. शफिक खान,वय ३२ वर्षे,सुहेल अहमद कुरेशी, वय २८ वर्षे,सर्व रा. मौजे हैदरपुर, जि. प्रतापगढ,उत्तर प्रदेश येथून पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
पोलिसांच्या चौकशीत हत्या झालेल्या युवक अक्रम कुरेशी याचे आरोपीं सोबत प्रतापगड उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून जुलै 2022 मध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याला मारण्याचा कट रचण्यात आला होता. त्यामध्ये आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून आरोपी मोहम्मद कैफ याने आपली प्रेयसी असलेल्या जस्सी तिवारी हिची मदत घेतली. तिने मयत अक्रम कुरेशी यास प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर त्याला भेटीसाठी भिवंडी येथे बोलावून हत्या करण्याच्या नियोजित स्थळी ती त्याच्या सोबत कार मध्ये बसून गेली. त्याठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या चौघा जणांनी अक्रम याच्यावर लोखंडी रॉड व दगडाने हल्ला चढवत त्याची हत्या केली . कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या गुन्ह्याचा तपास करीत या पाचही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास सध्या भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस करीत आहे. दरम्यान मयत अक्रमच्या कुटुंबियांनी हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.