कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची अस्मिता आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केले.
कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरिषद सदस्य ॲड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम २८९ अन्वये चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री ॲड. परब, शशिकांत शिंदे, अरुण उर्फ भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शुक्ला हा ‘एमटीडीसी’चा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्र मुंबई ही मराठी माणसाची अस्मिता आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील विविध समाज, समुदाय येत असतात आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक लोक मराठी भाषा उत्तम बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात. मात्र, अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एखाद्याचा आहार कोणत्या पद्धतीचा, प्रकारचा असावा याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. देशातील वैविध्य टिकले पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजेच मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी असे म्हणाले.
कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा संबंधित अधिकारी कितीही मोठा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा ‘मान-सन्मान’ राज्यात ठेवला जाईल”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्य सरकारची भूमिका मांडली. राज्यातल्या जनतेला आश्वस्त करत, या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले. कल्याण येथील योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला मारहाण आणि अन्यायाची बाब ‘पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन’च्या माध्यमातून आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule