दिवाळीच्या (DIWALI) निमित्ताने ठिक-ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. नागरिकांचा उत्साह आणि गर्दी यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. दादर, डोंबिवली यांच्यासह ठाण्यातसुद्धा दिवाळी पहाटच्या निमित्ताने शोभा यात्रेचे (SHOBHA YATRA) आयोजन करण्यात येत असते. शोभा यात्रेच्यावेळी वाहतूक कोंडी टाळता यावी, कायदा व सुव्यवस्था यांचे योग्यरीत्या पालन केले जावे, या अनुषंगाने, ठाणे वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीच्या मार्गांत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यातील (THANE) नौपाडा राम मारुती रोड आणि मासुंदा तलाव (MASOONDA TALAO) या ठिकाणी दिवाळी पहाटच्या (DIWALI PAHAT) निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी (TRAFFIC) लक्षात घेऊन १२ नोव्हेंबर, रविवार (12 NOVEMBER, SUNDAY) या दिवशी या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात तरुणाई उत्साहाने मासुंदा तलाव या परिसरात येते. या ठिकाणी विविध राजकीय पक्षांकडून रंगमंच उभारून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे यंदा जांभळी नाका येथील चिंतामणी चौक सर्कल, राजावंत ज्वेलर्ससमोर, न्यू इंग्लिश शाळेजवळ तसेच पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स (PNG JEWELLERS) चौक व शिवा प्रसाद उपहारगृहाजवळ सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे वाहतूक शाखेने जाहीर केलेल्या सूचनेत म्हटले आहे. या अनुषंगाने या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
१२ नोव्हेंबर, रविवार या दिवशी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हा वाहतुकीचा बदल अंमलात राहणार आहे. या बदलांमुळे अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड यांनी दिली आहे. घंटाळी साईनाथ चौक येथून पु. ना. गाडगीळ चौकाकडे येणाऱ्या वाहनांना श्रद्धा वडापाव दुकानाजवळ प्रवेश बंदी असणार आहे. ही वाहने घंटाळी देवी पथमार्गे पुढे जाणार आहेत. गजानन महाराज चौक (GAJANAN MAHARAJ CHAUWK) ते तीन पेट्रोल पंप रस्त्यावर काका सोहनी पथ गल्लीतून पु. ना. गाडगीळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहने तीन पेट्रोल पंप हरी निवास मार्गे जातील. तसेच, राजमाता वडापाव सेंटर येथून गजानन महाराज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. त्यामुळे ही वाहने गोखले रोडवरून (GOKHALE ROAD) जाणार आहेत.
हे ही वाचा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर
BMC: प्रदूषण नियंत्रणासाठी रस्त्यांची सफाई