कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरातील बोगस महारेरा प्रकरणातील साडेसहा हजार रहिवाशी बेघर होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर महापालिकेने ४८ इमारतींमधील रहिवाशांना पुढच्या दहा दिवसात घरे खाली करण्याची नोटीस पाठवली आहे. डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारतींवरील कारवाई आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला आणखी तीव्र वळण मिळाले आहे. एकीकडे शिंदे गटाच्या उपशहर प्रमुख यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यावर हत्येचा कट असल्याचा आरोप केला आहे. या पत्रकार परिषदेनंतर आता शिवसेना (ठाकरे गट) डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, “ज्यांच्यावर ४२० सारखे गुन्हे दाखल आहेत, जे तीन वर्षे तुरुंगात राहून आले आहेत, ते आम्हाला शिकवणार का? कारवाई थांबवण्यासाठी दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही फसवणूक झालेल्या नागरिकांच्या बाजूने ठाम आहोत!” तेलगोटे पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. फसवणूक करणाऱ्या बिल्डर आणि बोगस कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीवर लवकरच कारवाई होईल.” यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांनी यापूर्वीच गंभीर आरोप केले होते की, “ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी माझ्या हत्येचा कट रचला आहे. पोलीस संरक्षण काढायचा प्रयत्न सुरू आहे!” या आरोपांवर शिवसेना (ठाकरे गट) डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, “निवडणुकीत मी त्यांचा प्रचार केला नाही, म्हणून माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. मात्र, लवकरच सर्व पुरावे समोर आणू.”
आता या वादामुळे डोंबिवलीतील ६५ इमारती कारवाई प्रकरण राजकीय रणांगणात बदलले असून, ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. आता प्रशासन आणि न्यायालय या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
CIDCO चे हक्काचे घर मिळालेल्यांचे DCM Eknath Shinde यांच्याकडून अभिनंदन