विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाले. या निवडणुकीत जनतेने महायुतीला पूर्ण बहुमत दिलं आहे. राज्यात सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महायुतीमधील राज्याचा मुख्यमंत्री कोण अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यातच भाजप हा जास्त संख्याबळ असणारा महायुतीमधील मोठा पक्ष असल्यामुळे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होणार या चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण याची घोषणा झालेली नाही.
शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांनी पु्न्हा मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे आणि दुसरीकडे भाजपकडून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे दावे केले जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी देवाकडे साकडे घालताना दिसत आहेत. अशातच ठाण्यातील महिलांनी आज कोपरी परिसरातील दौलत नगर येथील सिद्धिविनायक मंदिरात गणरायाला प्रार्थना करीत पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावे याकरिता महाआरती केली. आजपर्यंत महिलांचा कोणीही विचार केला नाही मात्र एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली त्यामुळे आमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले पाहिजेत अशा प्रतिक्रिया महिलांनी यावेळी दिल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता शपथविधीची तयारी सुरु झाली आहे. मंगळवारी २६ नोव्हेंबरला महायुतीचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मंत्रिमंडळात एकूण २० मंत्री शपथ घेणार असल्याचं बोलले जात आहे. शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे ५ मंत्री शपथ घेणार आहेत आणि राष्ट्रवादीचे सुद्धा ५ मंत्री शपथ घेणार आहेत. तर भाजपचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. दोन्ही पक्षाने संभाव्य आमदारांची नवे दिल्लीत पाठवले होती. ज्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सावंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं समोर आले आहे. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, आदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील शपथ घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. दरम्यान, ठाण्यातील महिलांनी केलेल्या प्रार्थनेला यश येतंय का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा:
Bhaskar Jadhav: शिवसेना गटनेता पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भास्कर जाधव यांचे मोठे वक्तव्य