दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी मिळाली तर ते प्रत्येक क्षेत्रात अधिक यशस्वी होऊ शकतील असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी कल्याण येथे केले. महापालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी नानासाहेब फडके क्रीडा संकुल, लालचौकी कल्याण (प) येथे आयोजिलेल्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटनसमयी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाहाबाहेर असलेल्या इतर दिव्यांगांनाही प्रवाहामध्ये आणता येईल. शासनाच्या काही योजनांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव कोटा ठेवण्यात आलेला आहे अशी ही माहिती आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी आयुक्तांनी स्वतः या क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या अंध दिव्यांग महिलेबरोबर बुद्धिबळ खेळून सदर अंध महिलेचे खेळातील कौशल्य पाहून तिचे कौतुक केले.
समाज कल्याण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनीही अंध बांधवांबरोबर कॅरम या खेळामध्ये सहभागी होऊन खेळाचा आनंद लुटला. महापालिकेतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजनांच्या माध्यमातून सोयी सुविधा पुरविण्यात येत असून, दिव्यांग व्यक्तींना सुविधा पुरवण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे असे उद्गार समाज कल्याण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी यावेळी आपल्या भाषणात काढले. दिव्यांग व्यक्तींसाठी महापालिकेने आयोजिलेल्या या क्रीडा स्पर्धांबाबत दिव्यांग महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक केले. दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजिलेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, कॅरम अशा बैठ्या खेळांचा अंतर्भाव असून, मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये गोळा फेक, नेमबाजी, व्हीलचेअर स्पर्धा, धावणे इ. स्पर्धांचा अंतर्भाव होता. या विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होऊन दिव्यांग बांधवांनी स्पर्धांचा आनंद लुटला. यावेळी माजी नगरसेवक मोहन उगले, क प्रभागाचे सहा आयुक्त धनंजय थोरात, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर तसेच सुमारे 250 दिव्यांग बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या.
हे ही वाचा:
Mumbai Megablock: पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर आजपासून २ दिवसीय मेगाब्लॉक
Sunita Ahuja: गोविंदा- सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर सुनीता अहुजाची पहिली प्रतिक्रिया