रेल्वे प्रवास करून इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून जाणाऱ्या एका प्रवासी महिलेचा चोरट्याने पाठलाग करत अचानक तिच्यावर कैचीने वार केले व गळ्यातील मंगळसूत्र , कानातील डुल आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरी केला. या चोरीप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरट्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. दागिने चोरी करून पळालेल्या चोरट्याला गस्तीवरील रेल्वे पोलिसांनी काही वेळातच पकडलं. लालबहादूर बाकेलाल यादव (वय २४, रा. पीएनटी कॉलनी, डोंबिवली पूर्व) असं या चोराचे नाव आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रवासी संध्या नागराळ या बदलापूर पूर्वेकडील चिंतामण चौकात असलेल्या एका इमारतीत त्यांच्या कुटूंबासह राहतात. त्या डोंबिवलीत काही कामानिमित्ताने ३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास बदलापूर येथून आल्या होत्या. त्यानंतर लोकल ट्रेनने डोंबिवली रेल्वे स्थानकापासून ते कोपर रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करत त्या कोपर रेल्वे स्थानकात उतरल्या. पूर्वेच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळावरून त्या इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून पायी चालत जात होत्या. त्यावेळी रात्री ८ वाजून ५२ मिनिटाने त्यांच्यावर अनोळखी चोरट्याने पाळत ठेवून अचानक कैचीने वार करत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील डुल आणि महागडा मोबाईल असा मुद्देमाल हिसकावला आणि पळून गेला.
याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात संध्या नागराळयांनी तक्रार केली. तक्रारीवरून अनोळखी चोरट्या विरोधात कलम ३९५, १४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी तातडीने चोरट्याचा शोध घेण्यासाठी हालचाली सुरू करताच कोपर स्थनाकाजवळील रेल्वे रुळावर गस्तीवर असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतलं असून त्याला अटक केली. या संदर्भात सदर गुन्ह्याचा तपास करणारे लोहमार्ग पोलीस कर्मचारी निंलगेकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा, चोरटा लालबहादूर यादव याला गुन्हा घडल्यापासून थोड्या वेळातच अटक केली असून त्याने अशाप्रकारे आणखी चोरीचे गुन्हे केलेत का? याचा तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा :
ऐन दिवाळीत सदावर्तेंकडून एसटी बंदचा इशारा
‘सिंघम अगेन’ मध्ये खिलाडी अक्षय कुमारचा लूक आउट