सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळ ठाणे (रजि.) च्या वतीने यंदा ठाण्यात भव्य दिव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या अनुषंगाने ठाणे शहर व जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने महिला आणि पुरूषांच्या कुस्तीचे आयोजन केले आहे. भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. सदर मैदानात अनेक प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना मराठा केसरी किताबासह दोन चांदीच्या गदा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती आयोजकांच्या वतीने रमेश आंब्रे यांनी दिली.
येत्या १९ फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात या शिव जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी मराठा भूषण पुरस्कार देऊन देखील काही मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर सिमरन धनंजय समुंद्रे, सामाजिक क्षेत्रात लक्ष्मण बेल्गोजी, इतिहासकार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विश्वंभर शिंदे, क्रीडा क्षेत्रात पैलवान रंगराव पाटील, तर विशेष सन्मान चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई किशोर साळुंखे, सामाजिक क्षेत्रात चंद्रकांत प्रभाकर बागल (सी. पी. बागल) अशा या सहा मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार २०२५ ने सन्मान करण्यात येणार आहे.
या शिवजयंती उत्सवाची सुरूवात सकाळी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे. दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला असून प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. दुपारी ४ वाजता शिवव्याख्याते डॉ. विश्वंभर शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, पाच वाजेच्या सुमारास भव्य “मराठा केसरी” मर्दानी महिला व पुरुष कुस्ती स्पर्धांना सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या जयंती उत्सवास ठाणे शहरातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन रमेश आंब्रे यांनी केले आहे.