जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आसरा फाउंडेशन आणि मित्र मेळा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ८ मार्च २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा श्री मावळी मंडळ हायस्कूल, धोबी आळी, चरई, ठाणे (पश्चिम) येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे.
‘कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र’ या ध्येयाने आयोजित केलेल्या या मेळाव्यात अनेक नामांकित उद्योग आणि कंपन्यांमध्ये थेट नोकरीच्या मुलाखती (ऑन द स्पॉट जॉब इंटरव्ह्यू) घेतल्या जाणार आहेत. याशिवाय, कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण, स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन, अप्रेंटिसशिपसाठी नोंदणी, बायोडाटा कसा लिहावा आणि मुलाखत कशी द्यावी याचे प्रशिक्षण, स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि विविध कर्ज योजनांची (PMEGP, CMEGP, मुद्रा लोन, SEDD मनी योजना) माहिती तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मार्गदर्शन उपलब्ध असेल. ५० हून अधिक कंपन्यांचा समावेश या रोजगार मेळाव्यात होणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी ९ महामंडळाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
तसेच या रोजगार मेळाव्याचा माध्यमातून २००० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्याचे उद्घाटन ठाणे शहर आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच आसरा फाऊंडेशनचे विश्वस्त पद्मश्री उदय देशपांडे देखील उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे तसेच ठाण्यातील अधिकाधिक युवकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे.
हे ही वाचा:
अनिल परब यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांनी सभागृहाची जाहीर माफी मागावी – Pravin Darekar
….म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत! – CM Devendra Fadnavis