पनवेलमधील लाइफलाइन रुग्णालयात गेलेल्या एका २७ वर्षीय तरुणाचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धार्थ काटकर असे या तरुणाचे नाव असून डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे सिद्धार्थचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. तसेच, नाकात वाढलेल्या हाडाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या सिद्धार्थच्या मृत्यूची चौकशी करून डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून चौकशीला सुरुवात केली आहे. सिद्धार्थ काटकर खालापूर येथील मोपाडा येथे आई-वडील व बहिणीसह राहत होता. सिद्धार्थच्या नाकाचे हाड वाढल्याने त्याच्यावर दोन वर्षांपासून पनवेलमधील लाइफलाइन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला जास्त त्रास होऊ लागल्याने त्याच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला ६ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शस्त्रक्रिया दुपारी एक वाजता करण्याचे ठरल्याने सिद्धार्थच्या सर्व तपासण्या करून दुपारी एक वाजता त्याला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येऊन डॉक्टरांनी सिद्धार्थ याच्या हृदयाचे ठोके बंद पडल्याचे तसेच, उपचार सुरू असताना त्याचा पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याचे नातेवाइकांना सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. लाइफलाइन रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रकाश पाटील यांना याबद्दल विचारणा केली असता, सिद्धार्थच्या वडिलांना आम्हीच पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितल्याचा दावा त्यांनी केला. नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयाकडून मिळेल, असेही त्यांनी सांगितले. परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाला, त्याबाबत काय म्हणणे आहे, अशी विचारणा केली असता, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. डॉक्टरांकडून बिलकुल हलगर्जी झालेली नाही, असे सांगून त्यांनी डॉ. कल्पना पाटील यांची बाजू घेतली.
हे ही वाचा :
दिवाळीत सर्वत्र प्लास्टिकचे कंदील पाहून प्रिया बापटने व्यक्त केली खंत
‘त्या’ सहा जणांची नावं २४ तारखेला सांगतो; मनोज जरांगे