Thane City: कचरा, पाणी, गरीब महिलांना व दिव्यांग बांधवांना योजनेचा न मिळालेला लाभ, सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात न आल्याने नागरिकांची सुरक्षा, अनधिकृत बांधकाम, क्लस्टर योजना, रेंटलची घरे, स्मशानभूमी तसेच शहरातील व घोडबंदर वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यानी नागरिकांना ग्रासले आहे. ठाणेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढा अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्यमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी संपर्कप्रमुख नरेश मनेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे व इतर शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त सौरभ राव यांना वस्तुस्थिती छायाचित्रांच्या पुरावे देण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा करून सत्ताधारांनी आपली पोळी भाजून घेतली. परंतु जनतेच्या पैशांचा चुराडा जास्त व सुविधा कमी असे चित्र सध्या ठाण्यात दिसत असल्याने स्वच्छ व सुंदर असणारे हे ठाणे सध्या डबक्याचे व कचऱ्याचे साम्राज्य तयार झालेले ठाणे बनले आहे. ठाणे महापालिकेचे तिजोरी रसातळाला गेली त्यामुळे उगाचच नको त्या कामांवर उधळपट्टी थांबेल का? असा सवाल त्यांनी आपल्या या पत्रामध्ये केला आहे.
घोडबंदर वासियांना वाहतूक कोंडीचा फटका दररोज सोसावा लागतो. त्यामध्ये उपाय योजना करीत असताना नागरिकांना विश्वासात न घेता नागरिकांचा हक्काचा सर्विस रोड सुद्धा हायवे पूर्वद्रुतगती महामार्गावर विलीन करण्याचे नियोजन करीत आहेत. त्यामुळे या हायवे पूर्व दुती महामार्गावर असणाऱ्या अनेक सोसायट्या, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, यांना मोठा अडथळा ठरणार आहे. यासाठी शिवसेना नेते राजन विचारे तसेच संपर्कप्रमुख नरेश मनेरा यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्विस रोड हा असू द्या तो स्थानिक नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. ठिकठिकाणी कामे सुरू करून सर्विस रोड बंद केलेला आहे. त्यामुळे सर्विस रोड जर हायवे पूर्व दुती महामार्गास विलीन झाल्यास मोठे आंदोलन घ्यावं लागेल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. त्यावर आयुक्तांनी आठ दिवसांमध्ये एमएमआरडीए सोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले.
दिवा, मुंब्रा, कळव्यासह ठाणे शहर आणि घोडबंदर रोडवरील बेकायदेशीर बांधकामे उभी आहेत. या बांधकामांना कोण पाठीशी घालत आहे? या बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जाते? ठाणे शहराच्या विकासासाठी ज्यांनी आपली जागा सोडली. त्यामुळे त्या जागेवर उत्तम उद्यान रस्ते रुंदीकरण व इतर सुविधा नागरिकांना मोठ्या प्रमाणात मिळाल्या परंतु, त्यांना त्यांच्या जागेच्या मोबदल्यात अद्याप त्यांना घरे मिळालेली नाहीत. जी घरे रेंटलमध्ये बांधलेली आहेत त्यांची दुर्दशा अत्यंत बिकट झाली असल्याने तेथे कोणी राहत नाही. त्यामुळे सुमारे 2000 हून अधिक घरे त्या ठिकाणी ओसाड पडलेली आहेत. त्या ठिकाणी चरस, गांजे घेणाऱ्यांचे अड्डे बनले आहेत. त्या घरांमधील नळे व इतर वस्तू चोरल्या जाऊन उघडी पडलेली आहेत. परंतु हीच घरे दुरुस्ती करून त्यांना कायमस्वरूपी दिल्यास त्या इमारतीची देखभाल दुरुस्ती ही ते करू शकतील परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हे ही वाचा :