ठाणे जिल्ह्यातील बदलापूर याठिकाणी आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. ‘माझी चूक नव्हती मी या जातीत जन्माला आलो’ असे सुसाईड नोटमध्ये लिहून आंतरजातीय प्रेम विवाह करणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या सुखकर्ता इमारतीत घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्यानुसार पत्नीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी अंकिता गायकवाड, सासरा नागप्पा पुजारी, सासू शकुंतला, मेव्हणी प्रियांका आणि तिचा नवरा तसेच आर्वेश पुजारी व सागर असे गुन्हा दाखल झालेल्या सात आरोपांची नावे आहेत. तर यश गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अंजली गायकवाड या मृत तरुणाच्या आई असून त्या अनुसूचित जातीच्या आहेत. त्या मृत मुलासह बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या सुखकर्ता इमारतीत पंधरा वर्षापासून राहतात. मृतक यश हा मुंबई एअरपोर्ट येथे नोकरीला होता. त्यातच गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी कुर्ला भागात राहणाऱ्या अंकिता या तरुणीशी ओळख होऊन दोघात प्रेम संबंध निर्माण झाले होते. मात्र, या प्रेमाला अंकिताच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे अंकिताकडून मृत यशचा मोबाईल नंबर मिळवून त्याला अंकिताच्या घरच्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून ‘तू आमच्या सावलीत राहण्याच्या पण लायकीचा नाही’ असे बोलून त्याचा अपमान केला. मात्र तरीही अंकिता त्याला आई-वडिलांपासून चोरून-लपून भेटत होती. त्यानंतर तिनेच त्याला लग्नासाठी होकार देऊन दोघांनी नाशिक येथे जाऊन जून २०२३ मध्ये लग्न केले. त्यांनतर ते दोघे पुन्हा बदलापूरात राहण्यासाठी आले.
आपल्या मुलीने खालच्या जातीच्या तरुणांशी विवाह केल्याचा राग सासरच्या मंडळीचा होता. मात्र त्याला गोड बोलून सासरी बोलून त्याचा वेळोवेळी जातीवाचक बोलून अपमान करीत होते. त्यातच काही दिवसांनी पत्नी अंकिता ही देखील आई-वडिलांची साथ दिली आणि ती सुद्धा यशचा छळ केला, असे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच यश पत्नीला भेटण्यासाठी गेला असता त्याला सासऱ्याच्या मंडळीकडून अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर त्याने याच निराशातून २८ऑक्टोबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चार पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या घटनेनंतर २९ ऑक्टोबर रोजी मृताच्या आईच्या तक्रारीवरून बदलापूर पोलीस ठाण्यात पत्नी व सहा जणांवर भारतीय दंड कलम ३०६अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता, मृताच्या आईच्या तक्रारीवरून सुसाईड नोटच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ नोव्हेंबर रोजी आरोपी पत्नी आणि सासरा यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, इतर पाच आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, यापैकी एक अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा :
Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व
Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार