भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा शासकीय रुग्णालय भिवंडी शहरा सोबतच ग्रामीण भागातील लाखो नागरिकांकरीता मोफत शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारे एकमात्र रुग्णालय. भिवंडी पालिकेच्या मालकीचे हे रुग्णालय, त्याचा आर्थिक भार उचलणे शक्य नसल्याने अखेर पालिकेनेच हे रुग्णालय 2007 मध्ये शासनाच्या हवाली केले. परंतु या रुग्णालयात रुग्णसेवाच मिळत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळा या रुग्णालयात रुग्णांवर फक्त प्रथमोपचार करून थेट ठाणे आणि मुंबई येथे उपचारासाठी पाठवले जाते अशी ओरड नेहमीच केली जाते. अशी परिस्थिती काही वर्षांपूर्वी नक्कीच होती.पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा व त्यास शासनाने वेळोवेळी केलेली आर्थिक मदत तर या रुग्णालयाच्या अधिक्षक पदी डॉ. माधवी पंदारे या महिला वैद्यकीय अधिकारी रुजू झाल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी झटून प्रामाणिकपणे काम केल्याने हे रुग्णालय सध्या सुधारत असल्याने या रुग्णालयाची प्रकृती सुधारत असल्याचे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढलेली संख्या पाहून दिसून येत आहे.
तर शहर ग्रामीण सह वाडा येथून प्रसूती वेळी गंभीर झालेल्या महिला ठाण्याकडे जाताना रस्त्यात भिवंडी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारा व्हावेत यासाठी आग्रही असतात अशा वेळी भिवंडी रुग्णालयातील प्रसूती बाबत अनेक वेळा ओरड होत असते.पण या रुग्णालयात 3424 महिलांची प्रसूती झाली आहे.त्यामधील 418 महिलांवर प्रसूती शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत हे आपणाला नाकारता येणार नाही.भिवंडी शहर व ग्रामीण भागात श्वान दंशच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असताना 11 हजार 211 नागरिकांना झालेल्या श्वान दंशावर, 363 सर्प दंश तर 128 नागरिकांना झालेल्या विंचू दंशावर या रुग्णालयात उपचार झाले आहेत.
भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत गरीब कामगार वस्तीची संख्या मोठ्या प्रमाणावर असतानाच ग्रामीण भागात सुध्दा मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत असल्याने तालुक्याची लोकसंख्या 15 लाखांच्या आसपास गेली आहे. असे असताना नागरिकांसाठी चांगल्या व सुसज्ज आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासन कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून त्या देण्याचा प्रयत्न करीत असताना बऱ्याच वेळा कमी डॉक्टर व कर्मचारी संख्या यामुळे रुग्ण सेवा देताना ताण जरूर येतो, पण चांगल्या रुग्ण सुविधांमुळे सध्या या रुग्णालयात येणारे नागरीक समाधान व्यक्त करीत आहेत.