सुसाट वेगात व्हीआयपी सायरन वाजवत जाणाऱ्या कारचालकाने वाहतूक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन धमकावले. हिंदीतून ‘तू मला ओळखले नाही का, बुढ्ढे तेरेको ड्युटी करनी आती क्या’ असे म्हणत शिवीगाळ करुन सस्पेंड करण्याची धमकी देण्यापर्यंत मजल मारली. कुणाल बाकलीवाल असे आरोपीचे नाव असून क्रांती चौक ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
वाहतूक शाखेचे अंमलदार दैनसिंग जोनवाल हे सहायक फौजदार बागूल यांच्यासह २४ जानेवारी रोजी सायंकाळी मिल कॉर्नर सिग्नलवर कर्तव्यावर होते. यावेळी अचानक व्हीआयपी सायरन वाजवत महागडी डिफेंडर गाडी येत असताना पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. आरोपी बाकलीवाल याने चौकाच्या मधोमध गाडी (एम एच २० -जीके -१८१९) थांबवून पोलिसांना शिवीगाळ केली. त्यांच्यासोबत हुज्जत घालत ‘तू पहेचनता नही क्या, मै कोन हूँ, असे म्हणत बागूल यांना ‘बुढ्ढे तेरेको ड्युटी करने आती क्या, माझ्या नादी लागू नको’ असे म्हणत सर्वांना दोन तासांत सस्पेंड करतो, असे धमकावले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोटचेपी भूमिका का ?
भर चौकात सर्वसामान्यांसमोर पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. सर्वसामान्यांच्या बाबतीत थेट सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांनी याप्रकरणी केवळ अदखलपात्र (एनसी) दाखल केली. शिवाय, घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोरऐवजी सौम्य भूमिका घेतल्याने प्रत्यक्षदर्शींनी आश्चर्य व्यक्त केले.
पुन्हा एकदा खच्चीकरण
काही महिन्यांपूर्वी एका नेत्याच्या हट्टापायी काहीही चूक नसताना एका सहायक निरीक्षकाला वरिष्ठांनी नियंत्रण कक्षाची शिक्षा दिली. तेव्हाही पोलिसांमधून वरिष्ठांविषयी असंतोष व्यक्त झाला होता. आता पुन्हा वरिष्ठांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे पोलीस अंमलदाराचे मनोबल कमी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
हे ही वाचा :
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .