राज्यातल्या वाढत्या तापमानापासून लोकांना दिलासा मिळाला आहे, याचं कारण म्हणजे राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली असून गारठा सर्वत्र वाढला आहे. तर राज्यातल्या काही भागात पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. नोव्हेंबर महिन्यात गारठा वाढला असला तरी, या महिन्यात आणखी पारा घसरणार आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या भागात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. यासोबतच गोव्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
देशातही पारा घसरला
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह देशातील काही भागात पाऊस बरसण्याची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता आहे. गोव्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, राज्यातील इतर काही भागात तापमान वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. दिल्लीतल्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. तर मुंबई शहरात पहाटेच्या दरम्यान तापमान कमी राहणार असून दुपारी हे तापमान वाढण्याची शक्यता आहे.
‘या’ भागात वर्तवण्यात आला आहे पावसाचा अंदाज-
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यात २४ तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुद्दुचेरीमध्येही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या आठवडाभर अंदमान निकोबार बेटांवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. कराईकल आणि लक्षद्वीपमध्येही येत्या काही दिवसांत पाऊस पडेल अशी शक्यता आहे.
उत्तर भारतात देखील पारा घसरणार
भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवली आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण पूर्व आणि उत्तर भारतात पारा घसरून थंडी वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यासोबतच उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांवर याचा परिणाम होणार असून यामुळे गारठा वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
अहमदनगरमध्ये तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक
ड्रग्जमाफियाची सूत्र सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का?, संजय राऊत