Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले आहे. या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळविण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव यादव यांनी केले आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, “वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून अनेक गैरसमज पाहायला मिळत आहे. आम्ही कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे माघारी घेतलेले नाही. ज्या पात्र होत नाहीत, त्या महिला पत्र पाठवून पैसे माघारी देण्याबाबत सांगत आहेत. दररोज पाच सहा अर्ज जिल्हा पातळीवरून येत आहेत, अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. योजनेचे मूल्यमापन करण यात काही नवीन नाही. इतर योजनेतही दरवर्षी मूल्यमापन केले जाते. अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. तसेच शासनाच्या कुठलाही लाभ परत घेतला नाही.”
पुढे त्या म्हणाल्या की, आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवली नाही, ज्यावेळी पैसे माघारी पाठवायचे असतात, ते सरकारी तिजोरीत जमा होत असतात. नियोजन विभाग पैसे जमा करण्यासाठी विंडो तयार करून देतील, तिथे पैसे जमा होतील. आम्ही कुणाचे पैसे स्वतःहुन घेणार नाही, जे स्वतः हुन देतील त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील, अशी माहितीही अदिती तटकरे यांनी दिली. आम्ही शासन म्हणून कोणाचेही पैसे परत घेतलेले नाहीत. विभागाने किंवा सरकारने गेल्या पाच महिन्यातले पैसे परत घेण्याचा प्रश्नच येत नाही कारण आम्ही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही तटकरे म्हणाल्या.
हे ही वाचा :