इतिहास संशोधक आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. सावंत यांना दूरध्वनीच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असून प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना धमक्या दिल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना अश्लील शिवीगाळ करत घरात येऊन मारण्याची धमकी दिली.
सोमवारी २४ फेब्रुवारीला रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास हे धमकीचे फोन आले असून सावंत यांनी एक फेसबुक पोस्ट केली. जिथे त्यांनी प्रशांत कोरटकर या व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत अर्वाच्य शिवीगाळ केल्याचं म्हटलं आहे. सदर प्रकरणी दोन फोन आल्याची प्राथमिक माहिती असून पहिला फोन आल्यांनतर त्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. पण दुसरा फोन आला तेव्हा मात्र सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या. जिथं घरी येऊन बघून घेईन अशा भाषेत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक जाणकार व्यक्तींनी आपआपल्या परीने चित्रपटाचे विश्लेषण केले होते. इंद्रजित सावंत यांनी देखील यावर त्यांच्या मताप्रमाणे विश्लेषण केले होते, त्यामुळे त्यांना प्रशांत कोरटकर या व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ब्राह्मणद्वेष पसरवण्याप्रकारणीचा रोष आपल्या बोलण्यातून दाखवला. तसेच जेम्स लेनच्या पुस्तकाचा आधार घेतला आहेस का? बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकाचा आधार घेतला आहेस का? अशा एकेरी भाषेत त्यांना धमकावण्यात आले आहे. याबाबत, रोहित पवार यांनी एक्सच्या माध्यमातून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
प्रसिद्ध इतिहासकार संशोधक इंद्रजित सावंत यांना मुख्यमंत्र्यांचं नाव वापरून देण्यात आलेली धमकी निषेधार्ह आहे. सावंत यांनी इतिहास संशोधनात केलेलं कार्य महाराष्ट्र आणि येणाऱ्या पिढीसाठी मोलाचं आहे. अशात कोण तो प्रशांत कोरटकर नामक व्यक्ती सत्तेचा आधार घेऊन सावंत यांना धमक्या देत असेल, तर आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात नेहमीच विचारवंत, संशोधक आणि इतिहासकार यांना आदराचे स्थान राहिलेलं आहे. पण एका विशिष्ट हेतूने पुरोगामी विचारवंतांवर हल्ले करण्याची मानसिकता महाराष्ट्रासाठी शोभणारी नाही. पुरोगामी विचारवंतांवर पूर्वी झालेले जीवघेणे हल्ले पाहता इंद्रजित सावंत यांना सरकारने तातडीने पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी आणि धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, ही विनंती.
हे ही वाचा:
राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे प्रयागराज येथे कुंभस्नान
‘एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल’ CM Devendra Fadnavis यांचा विश्वास