शहरात खालचे गाव बौद्धवाडा येथे दुचाकीवर संशयास्पद फिरत असलेल्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चार लाख अकरा हजार रुपयांच्या बनावट नोटा, दुचाकी, मोबाईल असा एकूण पाच लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.
२ फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील हे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पेट्रोलिंग करीत असताना खालचे गाव बौध्दवाडा येथे दुचाकीवर (क्रं.एम.एच.१८/ सी. ओ.८५६७) संशयास्पद फिरत असताना तिघे जण आढळून आले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय वाढला. त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची अंगझडती व बॅग यांची तपासणी करण्यात आली. त्यात भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा सापडल्या. एकूण ८२३ नोटा आढळून आल्या. त्यांची किंमत चार लाख अकरा हजार पाचशे रुपये आहे. तसेच दहा हजार रुपयांचा मोबाईल, सव्वा लाख रुपयांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे पुंडलिक ऊर्फ समाधान नथा पदमोर (रा. हट्टी,ता.साक्री), पिरन सुभाष मोरे (रा. चांदपुरी,ता.शिरपूर), रंगमल रतीलाल जाधव (रा.ऐचाळे,ता.साक्री) अशी आहेत. याबाबत पो. कॉ. विनोद अखडमल यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १८०,३(५)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक हेमंत खैरनार, हवालदार राजेंद्र रोकडे, पो. कॉ. भटू साळुंके, योगेश दाभाडे, सचिन वाघ यांनी केली.
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?