spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे Dr. Neelam Gorhe यांचे निर्देश  

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुनापर्यंतच्या घटना घडतात. ऑनर किलिंग रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतला आहे. यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. लातूर, संभाजीनगर, कोल्हापूर येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनाबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या घटनांचा आढावा घेण्यात आला.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षा गृह (सेफ हाऊस) निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि याबाबतचा सविस्तर अहवाल दि. 30 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावा. ऑनर किलिंग च्या घटनेमधील पीडित मुलींचे समुपदेशन व्हावे तसेच मनोधैर्य योजनेतून पीडित महिलेला काही मदत म्हणून लाभ देता येईल का पहावे, त्यामुळे अशा मुलींना मदत होईल. तसेच, या पीडित महिलांना सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचनाही यावेळी दिल्या. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची सामाजिक मानहानी, कौटुंबिक त्रास आ​णि ऑनर किलिंगपासून संरक्षण कण्यासाठी ‘अॅट्रॉसिटी’च्या धर्तीवर ‘आंतरजातीय विवाह कायद्या’ची निर्मिती करण्यासाठी समिती गठीत केली होती या समितीचे पुनर्गठन करावे.

आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सुरक्षेसाठीच्या हेल्पलाइन आणि विविध समित्यांची राज्यस्तरीय प्रचार प्रसिद्धी करावी, ज्यामुळे महिलांना सुरक्षितता आणि कायदेशीर मदत वेळेत उपलब्ध होईल आणि या महिलांना कायदेशीर संरक्षण मिळेल,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या काही तक्रार प्राप्त झाल्यास अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या आधिकाऱ्याने त्याचा तपास करून अहवाल सादर करावा. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल करून पुढील कार्यवाही करावी आणि अशा जोडप्यांच्या संरक्षणाकरिता विशेष कक्ष आरक्षित करावेत किंवा वसतीगृह द्यावे, अशा सूचनाही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या. यावेळी, बैठकीला सामाजिक न्याय आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, महिला व बालविकास आयुक्त राहुल मोरे, संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित कोल्हापूर, लातूर निवासी जिल्हाधिकारी संगीता टकले, सोमय मुंडे, पोलीस आयुक्त, आयुक्तालय पुणे संबंधित अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

हे ही वाचा:

आत्ताची सर्वात मोठी बातमी, परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराडच्या आईच आंदोलन, म्हणाली ‘माझ्या लेकाने…’

या अभिनेत्याने लग्नासाठी स्वीकारला Islam धर्म, महादेवाचा भक्त असलेला आत ५ वेळा नमाज अदा करतो; पत्नीवर लव्ह-जिव्हादचा आरोप!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss