Nana Patole on Dhanajay Munde Resignation: आज दिवसभर विधानसभेचं अधिवेशन सुरु असताना रात्री मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटोस बाहेर आले. त्यामुळे आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेण्यात आला. तर दुसरीकडे ऐन अधिवेशनाच्या वेळीच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो बाहेर येऊन धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला यामागे कोणते राजकीय षडयंत्र तर नाही? असा प्रश्न देखील उपस्तिथ करण्यात आला आहे. राज्यात एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे महापुरुषांचा अपमान करण्यात येत असल्यावरूनही विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नैतिक जबाबदारी म्हणून महायुतीमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकातून म्हटलं आहे. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून नैतिकता कुठे होती, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यापूर्वीच हत्याप्रकरणाचे फोटो पोहोचले नाहीत का, असा सवाल देखील विरोधकांनी उपस्थित केला आहे. तसेच, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्यात काल बैठक झाली. त्यानंतर, सकाळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याचे सांगितले. मात्र, तांत्रिकदृष्ट्या अद्यापही त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची माहिती विधिमंडळाच्या सभागृहात सांगण्यात आली नसल्याचे काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं आहे.
समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली होती, औरंगजेब हा उत्तम प्रशासक असल्याचे आझमी यांनी म्हटले होते. तर, प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन करुन धमकी देत शिवाजी महाराज व संभाजी महाराजांबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्यानेही सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी सरकारला याच मुद्द्यावरुन लक्ष्य केलं आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा लपवता यावा, विरोधकांकडून विचारणा होऊ नये म्हणून आजचं कामकाज बंद पाडण्यात आलं, या सरकारचा निषेध केला पाहिजे. एकीकडे शेतकरी चिंतेत आहे, पीकाला भाव मिळत नाही. सध्या शेतकरी उपाशी आणि सरकार तुपाशी अशी परिस्थिती आहे. आझाद मैदानावर एवढे मोर्चे येत आहेत, सरकारला त्याची काळजी नाही. राज्यात आज जे काही संतापजनक सुरू आहे, पण सरकारने विधानसभा बंद पाडली, आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. तसेच, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरही भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती थेट माध्यमांना दिली. पण, सभागृहाला दिली नाही. गेल्या अधिवेशनात नागपुरात जे काही बोलले ते खोट होतं, अजून किती लपवणार. गृहखात्याकडे ही माहिती नव्हती का, गृहखात्याने ही माहिती का लपवली, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे. संतोष देशमुख प्रकरणात गुन्हेगाराला वाचवण्याचं काम सरकार करत होते, हे सरकार देखील सहआरोपी आहे. या सरकारला हिशोब द्यावा लागणार, असे पटोले यांनी म्हटले. मुख्यमंत्री रात्री ताफा घेऊन अजित पवारांना भेटायला जातात, राजीनामा लिहून घेतात. राजीनामा आल्यानंतर त्यांनी थेट माध्यमांना येऊन सांगितलं. पण, नियमानुसार मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला त्याबाबत सांगणं गरजेचे समजले नाही. त्यामुळे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले. त्यामुळे, आता उद्या अधिवेशन सभागृहात काय होतं, हे पाहता येईल.
काँग्रेसचे आमदार नाना पटोले म्हणाले की, मंत्रिमंडळात असे अनेक मंत्री आहेत आणि महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे. अशा मंत्र्यांवर सरकार कधी कारवाई करणार असा प्रश्नही त्यांनी विचारला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “सरकारला हे करायला इतका वेळ लागला. याचा अर्थ सरकार दोषींना संरक्षण देत आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे… महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असे अनेक मंत्री आहेत. प्रश्न असा आहे की अशा मंत्र्यांवर कारवाई कधी होणार?” देशमुख यांच्या हत्येचे भयानक फोटौँ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ मार्च रोजी हा निर्णय घेतला. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते.
हे ही वाचा:
Santosh Deshmukh Murder: मन विचलित करणारे संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटोस आले समोर
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश