Thursday, November 30, 2023

Latest Posts

दोन उपमुख्यमंत्री पण विठुरायाची महापूजा कोण करणार?

आषाढी यात्रेची महापूजा मुख्यमंत्री आणि कार्तिकी यात्रेची महापूजा उपमुख्यमंत्री करतात अशी प्रथा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे,

आषाढी यात्रेची महापूजा मुख्यमंत्री आणि कार्तिकी यात्रेची महापूजा उपमुख्यमंत्री करतात अशी प्रथा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे, पण यंदाच्या पूजेचा पेच मात्र कायम राहिला आहे. राज्याला दोन दोन उपमुख्यमंत्री असताना यंदाची कार्तिकी पूजा कोण करणार याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. मंदिर समितीच्या बैठकीत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि कोणत्याही उपमुख्यमंत्र्याला बोलावू नये अशी भूमिका घेतली.

मंदिर समिती बैठकीत गोंधळ
कार्तिकी पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिल्यास यात्रा कालावधीत होणाऱ्या प्रकाराला शासन आणि मंदिर समिती जबाबदार राहील असा इशारा मराठा आंदोलकांनी आज मंदिर समितीला दिला. यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनामुळे 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढीच्या पूजेला बंदी करून येऊ दिले नव्हते. तशीच वेळ पुन्हा येईल असा इशारा रामभाऊ गायकवाड यांनी दिला

2018 ची पुनरावृत्ती घडेल
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिलेली असली तरी आम्ही पंढरपूरमध्ये मंत्री, आमदार, खासदार यांची बंदी उठवलेली नाही. आधी आरक्षण देऊन तुम्ही पूजेला आल्यास आम्ही फुले टाकून स्वागत करू, मात्र बळाचा वापर करून आल्यास आम्ही येऊ देणार नाही आणि होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आंदोलक किरणराज घाडगे आणि संदीप मांडवे यांनी दिला.

महापूजेला येऊ देणार नाही
बैठकीनंतर मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सावध पवित्र घेत संतप्त मराठा आंदोलकांचा प्रक्षोभ आम्ही शासनापर्यंत पोचविणार असून कोणालाच पूजेला मंदिर समिती निमंत्रण देणार नाही असं स्पष्ट केलं. जो निर्णय घ्यायचा आहे तो शासन घेईल अशी भूमिका त्यांनी घेतली.

यापूर्वी राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने यंदा कार्तिकीची महापूजा कोण करणार हा पेच मंदिर समिती समोर होता. यापूर्वी 2021 साली कार्तिकीची महापूजा महाआघाडीच्या उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सपत्नीक केली होती. तर गेल्या वर्षी 2022 साली कार्तिकीची महापूजा महायुतीचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली होती. तसे तर राज्याला उपमुख्यमंत्री नसताना मंत्रिमंडळाच्या जेष्ठ मंत्र्याच्या हस्ते आजवर कार्तिकीची पूजा होत आली आहे.


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2014 ते 2019 याकाळात त्या त्या वेळचे मंत्रिमंडळातील जेष्ठ सदस्य म्हणून एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकीच्या शासकीय महापूजा केल्या होत्या. पण यंदा राज्याला दोन उपमुख्यमंत्री असताना एकालाही पूजेला न येण्याची नामुष्की शासनावर आली आहे . यासाठी पूर्वी मंदिर समितीने कोणाला निमंत्रण द्यायचे याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाला लेखी विचारणा केली होती मात्र शासनाकडून कोणतेच उत्तर आले नव्हते. त्यात आता कोणालाच महापूजेला येऊ देणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतल्याने नेमकी कार्तिकीची महापूजा कोण करणार याचा निर्णय महायुतीला करावा लागणार आहे.

एकंदर महापूजेसाठी उपमुख्यमंत्री आले तर यात्रेत मोठा गोंधळ होऊ शकणार असून याचा फटका गोरगरीब वारकऱ्यांना बसू शकणार असल्याने आता कार्तिकी महापूजा कोणाच्या हस्ते करावी हा पेच मंदिर समिती सोबत महायुती सरकारपुढेही उभा राहिला आहे. अद्याप मनोज जरंगे यांनी कार्तिकी महापुजेबाबत कोणतेही वक्तव्य केले नसले तरी मराठा समाज मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने लाखो भाविक यात्रेला येत असताना कार्तिकी यात्रा कशी शांततेत करायची हा पेच आता शासन आणि प्रशासनासमोर असणार आहे .

 

हे ही वाचा : 

शशिकला भगवान मस्के या बीआरएसच्या सरपंचपदाच्या उमेदवार

तेलंगणातील BRS ची महाराष्ट्रात एन्ट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss