Friday, December 1, 2023

Latest Posts

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात गदारोळ

मराठा आरक्षणासाठी सुरू झालेले आंदोलन आता आणखी तीव्र होऊ लागले आहे. यवतमाळमध्ये  आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत आज ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पडत आहे. मात्र, या कार्यक्रमात मराठा आरक्षण आंदोलकांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. त्याशिवाय, शिवसेना ठाकरे गटाच्या  शिवसैनिकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या शिवसैनिकांनादेखील ताब्यात घेतले आहे.

यवतमाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आंदोलन, घोषणाबाजी होऊ नये यासाठी खबरदाराची उपाय म्हणून पोलिसांनी आज काही आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतरही काही आंदोलकांनी आज घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणासाठी काही आंदोलकांनी घोषणाबाजी केली. घोषणाबाजी सुरू होताच पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.

ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी
शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी या कार्यक्रमात घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. सोयाबीन आणि कापसाला दर मिळावा, पिक विमा, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्यांवर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. महिला शिवसैनिकांनी देखील घोषणाबाजी केली. त्यांनाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी पिकाला भाव नसल्याने चिंताग्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे  आमदार प्रकाश सोळंके  यांच्या माजलगाव  येथील घरावर मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी आंदोलकांची दगडफेक करण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) संदर्भात सोळंकेंनी काल वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद उमटले आहेत.

सोशल माध्यमांवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. एका मराठा आंदोलकानं अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरू केली. याच ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना आमदार प्रकाश सोळंकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. याच्याच निषेधार्थ प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यावर आक्रमक आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. आंदोलकांनी सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्याही जाळल्या.

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंना मराठा आंदोलकांनी पिटाळून लावले
कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेना मराठा आंदोलकांनी सोलापुरातून परतवून लावले. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात सुरु असलेली ही बैठक उधळून लावत सोलापुरातून परत जण्याचा सल्ला मराठा आंदोलकानी म्हात्रेंना दिली. त्यानंतर आमदार म्हात्रे हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले, मात्र त्यावेळी सुद्धा सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर जाऊन तुफान घोषणाबाजी करत गाडीपर्यंत आणून सोडले. तसेच, “मराठा समाज संतप्त आहे, आज पारगावातील नेत्यांना आम्ही हाकलून लावतोय, या पुढे जिल्ह्यातील आमदारांना सोडणार नाही. आता जर कोणी सोलापुरात आलं तर त्याचे कपडे फाडून हाकलून लावू, असा मराठा समाज आंदोलकांनी आक्रमक इशारा दिला आहे.

हे ही वाचा : 

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss