बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे प्रमुख नाव आहे. त्याच चर्चेत मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा देखील समावेश आहे. वाल्मिक कराड यांना मंत्री धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्याचाही आरोप होत असून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. यात आता आणखी भर पडली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया वरती एक पोस्ट शेयर केली आहेत. त्यात वाल्मिक कराडच्या बीड येथील वाईन शॉपच्या विरोधात आरोप केले आहेत. यासाठी त्यांना मिळालेल्या एका पत्राचा उल्लेख अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
अंजली दमानिया यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणावर अनेकदा सोशल मिडियावर पोस्ट करून किंवा प्रत्यक्ष माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक दावे करणाऱ्या पोस्टही केल्या आहेत. या पोस्टमध्ये दाव्यांच्या समर्थनार्थ काही कागदपत्रांचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. आज सकाळी अंजली दमानिया यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांना एक गोपनीय पत्र मिळाल्याचे म्हटले जात आहे. त्या पत्राची माहिती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे.
पत्रात असे लिहिले आहे की, वाल्मिक कराड (Walmik Karad) यांची केज, वडवनी, बीड आणि परळी इथे चार ते पाच वाईनची दुकानं आहेत. प्रत्येक दुकानाचा बाजारभाव अंदाजे पाच कोटी इतका आहे. ती जमीन त्यांनी केज येथे १ कोटी ६९ लाखांना २९ नोव्हेंबर २०२४ रोजी घेतली. तीन दिवसांत त्याला परवानगी देखील मिळाली. वास्तविक पाहता जमिनीचा सातबारा हा कमीतकमी १५ दिवसांनंतर होतो. पण सगळे कायदे कसे धाब्यावर बसवण्यात येतात याचं हे उदाहरण”, असं अंजली दमानिया यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.