spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

पर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो, Kesari Tours चे केसरीभाऊ पाटील यांना दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण

Kesari Tours: पर्यटन क्षेत्रातील संधीची ओळख करून देणारा, महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा उद्यमी म्हणून उद्यमशील केसरीभाऊ पाटील यांचे नाव सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरी टूर्सचे संस्थापक, अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘उद्योग-व्यवसायाच्या एखाद्या नव्या क्षेत्रात उतरून, त्यामध्ये नाव कमावून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची क्षमता केसरीभाऊ पाटील यांनी आपल्या अंगी असलेल्या व्यवस्थापन आणि उद्मोजकतेच्या कौशल्याच्या जोरावर सिद्ध केली. ‘केसरी टूर्स’ च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेची ओळख जगभर पोहचवली. या क्षेत्रातील रोजगार आणि व्यवसाय, व्यवस्थापन संधीची माहिती आणि अनेकांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा देण्यात ते मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. त्यांच्या निधनामुळे एका धडाडीच्या, उद्यमशील अशा व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. केसरीभाऊ यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या केसरी समूहाशी निगडित सहृदयींच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

जगासोबतचा एक सांस्कृतिक दुवा निखळला

मराठी माणसाच्या मनात पर्यटनाची आवड रुजवून जगाची सफर करण्याची सवय लावणारे केसरीनाथ पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनक्षेत्राचा दीपस्तंभ अस्तंगत झाला आहे. आपल्या अनोख्या कल्पकतेने आणि कौशल्यपूर्ण व्यवस्थापनाने पर्यटकांना जगभ्रमण करणारे व असंख्यांच्या जगण्यात जगातील आनंददायी अस्तित्वाच्या आठवणी पेरून अनुभवांनी अनेकांचे जीवन समृद्ध करणारे केसरीदादा हे पर्यटनक्षेत्राच्या पटलावरील बिनीचा मोहरा होते. केसरी टूर्सच्या नावाने आयोजित केलेल्या जगभरातील असंख्य सहलींतून त्यांनी देशाचे जागतिक संस्कृतीदूत म्हणून अनामपणे बजावलेल्या भूमिकेचा भारताच्या जागतिक प्रतिष्ठेत मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या निधनाने जगासोबतचा एक सांस्कृतिक दुवा निखळला आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पाटील कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरांजली वाहिली आहे.

केसरी टूर्सचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या या उद्यमशील व्यक्तिमत्त्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पाटील कुटुंबियांच्या आणि केसरी समूहाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो! अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हे ही वाचा:

माझ्या घरात तलवारी असायच्या, सासऱ्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध – अभिनेत्री Janhavi Killekar

Chhaava Movie: ‘छावा’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss