परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हयामध्ये मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच मा विभागीय आयुक्त, मा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्राना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी दूरचित्र प्रणालीव्दारे (V.C) घेतलेल्या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
- राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल.
- परीक्षा सुरु होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल.
- जिल्हयातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे.
- जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित घटकांची Facial Recognition System व्दारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल.
- Maharashtra Prevention Of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणा-यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.
- परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात १६३ कलम लागू करण्यात येईल.
- मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय/अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर दि.१८/०३/२०२५ ते २०/०३/२०२५ या कालावधीत Out of Turm ने आयोजित करण्यात आलेली आहे.
- प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal), श्रेणी इ. परीक्षांचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरून घेण्यात येणार आहेत. याबाबतची लिंक व सविस्तर सूचना विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक शाळांना देण्यात आलेल्या आहेत.
- उपरोक्त बाबी वेळोवेळी सर्व माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना कळविण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित माध्यमिक शाळांशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांन बळी पडू नये.