विधानसभा निवडणूक २०२४ च्या २८८ जागांसाठी मतदानाला आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाला दोन तास उलटून जात नाही तोच नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. यावेळी आक्रमक झालेल्या सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
सुहास कांदे यांनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळ यांनी अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर मोठा राडा झाल्याचे दिसून आले. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले. समीर भुजबळ यांनी आडव्या गाड्या लावत मतदारांना घेऊन चाललेली बस अडवली, यानंतर सुहास कांदे तिथे आले असताना त्यांनी थेट समीर भुजबळांच्या कार्यकर्त्याला मारून टाकण्याची धमकी दिली. “आज तुझा मर्डर फिक्स आहे”, असे म्हणत सुहास कांदे हे कार्यकर्त्याला संतापून म्हणाले. यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात आलेल्या या प्रकारानंतर निवडणूक आयोगाचे पथक या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी बसमध्ये थांबविलेल्या मतदारांची चौकशी आणि बॅग तपासणी केली. निवडणूक आयोगाच्या बसमधील चौकशीत मतदार हे स्थानिक ढेकू गावचे असल्याचे सिद्ध झाले. आता या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. काही वेळाने समीर भुजबळांनी अडवून ठेवलेले मतदार संतापल्याचे पाहायला मिळाले. “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू नका, पोलिसांनो…आमचे आधारकार्ड तपासा, आम्ही बिहारी नाही तर मतदार संघातलेच आहोत, जेवणासाठी केवळ थांबलेलो होतो, संयम बाळगला, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”, असे म्हणत मतदारांनी संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
288 मतदारसंघात कोण-कोण आहेत उमेदवार? महायुती VS महाविकास आघाडी, वाचा सविस्तर माहिती
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.