संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव नेहमीच चर्चेत राहिले. आता काही दिवसापासून ते रुग्णालयात होते आणि त्यांना भेटण्यासाठी सुरेश धस गेले होते. अर्थात ही भेट महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापवणारी ठरली होती. झालेल्या भेटीच्या अनुषंगाने वेगवेगळे तर्कवितर्क विणले जात होते. या सगळ्या चर्चेत सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात मनोमिलन होत असल्याचं देखील बोलल्या जातंय. नंतर सुरेश धस यांच्यावर मराठा समाजाच्या माध्यमातून आरोपही करण्यात आलेत. मनोज जरांगे पाटील, अंजली दमानिया व इतर अनेक जण यावर नाराजी व्यक्त करत होते. दुसरी गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे जनता दरबार किंवा इतर बैठकीला का येत नाहीयेत हाही प्रश्न विचारला जायचा. या सगळ्या संदर्भात एक माहिती समोर आली आणि त्यानुसार त्यांना एक विलक्षण आजार झाला असल्याचं दिसून येतंय.
काही दिवसांपूर्वी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा एक दुर्मिळ आजार झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. या आजारामुळे धनंजय मुंडे यांच्या रोजच्या आयुष्यावर देखील मोठा परिणाम झाला असल्याचं दिसलंय. म्हणजेच या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाहीये. याच कारणामुळे त्यांना मंत्रिमंडळाच्या कामकाजाला, जनता दरबाराला किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहता आलं नाहीये. या संदर्भात धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. धनंजय मुंडे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, “माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉक्टर टी पी लहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला बेल्स पालसी नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे मला सध्या सलग दोन मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाहीये. त्यामुळे सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं नाहीये. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल,” अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
धनंजय मुंडेंना झालेला बेल्स पालसी हा आजार नेमका आहे तरी काय?
बेल्स पाल्सी हा आजार ज्या माणसाला होतो त्याच्या चेहऱ्यावर वरचे स्नायू कमजोर होत असतात. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एका बाजूला अचानक अशक्तपणा जाणवायला लागतो. चिंतेची गोष्ट म्हणजे या आजारामुळे काही वेळा अर्धांग वायू देखील होऊ शकतो. चेहऱ्याच्या एका बाजूवर त्याचा परिणाम होत असल्याने एक डोळा बंद करण्यात अडचणी येतात. अर्थात चेहऱ्याच्या हालचालीवर निर्बंध येतात म्हणजेच तो माणूस हसूही शकत नाही असं बोललं जातंय, अर्थात योग्य उपचार घेऊन हा आजार बरा होऊ शकतो. बेल्स पालसी हा सर्दी सारख्या विषाणुजन्य आजारानं किंवा मग चेहऱ्यावरच्या मज्जातंतूला सूज किंवा काही नुकसान पोहोचलेलं असेल तर हा आजार होऊ शकतो. हा आजार झालेल्या व्यक्तीला पूर्णपणे बरं होण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ लागू शकतो.
बेल्स पाल्सी हा आजार नेमका कशामुळे होतो?
बेल्स पाल्सी हा आजार जास्त तणाव किंवा मानसिक दडपणामुळे होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. थंडी लागणे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या व्यक्तींनाही हा आजार होऊ शकतो. मधुमेह किंवा इतर काही आरोग्य समस्या असलेल्या रुग्णांमध्ये ही या आजाराची लक्षणं जाणवू शकतात. विशेष म्हणजे जेवणात मिठाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे हा आजार उद्भवू शकतो. मिठाचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. स्ट्रोक हे चेहऱ्यावर येणाऱ्या पक्षाघाताचा मुख्य कारण असल्याचं डॉक्टरांचं मत आहे.
बेल्स पाल्सी आजार होण्याची लक्षणे कोणती आहेत?
चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी किंवा लकवा येतो तर डोळे आणि तोंड व्यवस्थित बंद होत नाही. बोलताना किंवा खाताना अडचणी येतात. चेहऱ्यावर मुंग्या येणे किंवा चेहरा सुन्न होतो तसेच अन्नाची चव समजण्यास अडचणी येतात. कानाजवळही वेदना आणि संवेदनशीलता वाढते.
Narendra Modi : RSS मुळे माझा मराठीशी संबंध म्हणत, नरेंद्र मोदींनी केला मराठी भाषेचं कौतुक
Follow Us